अरुण गवळीला हवाय पॅरोल : हायकोर्टात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 08:08 PM2020-02-04T20:08:28+5:302020-02-04T20:09:37+5:30
मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने पत्नी गंभीर आजारी असल्यामुळे ३० दिवसाचा पॅरोल मिळावा, याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने पत्नी गंभीर आजारी असल्यामुळे ३० दिवसाचा पॅरोल मिळावा, याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने मंगळवारी गवळीचे म्हणणे ऐकल्यानंतर राज्य सरकारला नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.
याचिकेवर न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गवळीने पॅरोलसाठी सुरुवातीला विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. तो अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विभागीय आयुक्तांनी अर्ज फेटाळताना आपले म्हणणे योग्य पद्धतीने विचारात घेतले नाही, असा आरोप गवळीने केला आहे. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला २० मे २००८ रोजी अटक करण्यात आली होती. सध्या तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीतर्फे अॅड. मीर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.