नागपूर : लॉकडाउन लांबल्यामुळे मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला पॅरोलमध्ये २४ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी शुक्रवारी गवळीची यासंदर्भातील याचिका मंजूर केली.
पत्नी गंभीर आजारी असल्याच्या कारणामुळे गवळीला सुरुवातीला ४५ दिवसाचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार त्याला २७ एप्रिल रोजी कारागृहात आत्मसमर्पण करायचे होते. परंतु, लॉकडाउनमुळे उच्च न्यायालयाने त्याला पहिल्यांदा १० मेपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर लॉकडाउन लांबले. परिणामी, न्यायालयाने गवळीच्या पॅरोलमध्ये दुसऱ्यांदा वाढ केली. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.मुलीचा विवाह संपन्नमुंबई : लॉकडाऊनच्या काळात गँगस्टर अरुण गवळीची मुलगी योगिता मराठी कलाकार अक्षय वाघमारेच्या विवाहबंधनात अडकली. शुक्रवारी दगडी चाळीत मोजक्या व्यक्तीच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. २९ मार्च रोजी मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा विवाह होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे ही तारीख पुढे ढकलत ८ मे चा मुहूर्त काढण्यात आला. मुळचा पुण्याचा असल्याने अक्षयने लग्नासाठी पोलिसांची परवानगी घेत मुंबई गाठली.