आनंद डेकाटेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्युत खांबावर चढून लाईन दुरुस्त करणारे तंत्रज्ञ विद्युत सहायक पाहिले तरी अंगावर काटा उभा राहतो. कालपर्यंत हे काम केवळ पुरुष मंडळीच करीत होती. परंतु केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या कामाला एका महिलेने आव्हान म्हणून स्वीकारले आणि आयुष्याची एक वेगळी वाट निवडली. अरुणा वाटकर असे या तरुण महिलेचे नाव. त्या सध्या एमएसडीसीएल (वीज वितरण कंपनी) वाडी येथील कार्यालयात तंत्रज्ञ विद्युत सहायक म्हणून कार्यरत आहेत.वीज विभाग म्हटला की, विजेच्या तक्रारी आल्या. एखाद्या परिसरातील वीज गेली असेल तर तेथे जाऊन दुरुस्ती करणे, एखाद्याचे मीटर खराब झाले असेल तर ते दुरुस्त करणे आदींसह थकीत बिलाच्या वसुलीपासून तर कार्यालयीन कामे त्यांना करावी लागतात. कर्तव्य म्हणून त्या ही सर्व कामे प्रामाणिकपणे पार पाडतातच परंतु त्यांना या कामामध्ये आनंदही मिळतो, हे विशेष. अरुणा या मूळचा नागपूरच्या तांडापेठ येथील रहिवासी. घरी चार बहिणी व एक भाऊ. आई-वडिलांनी चारही बहिणींना मुलाप्रमाणेच वागवले. वैशालीनगर येथील महात्मा फुले शाळेत दहावी तर एससीएस पाचपावली येथून बारावी झाल्यानंतर शासकीय आयटीआयमध्ये त्यांचा नंबर लागला. वायरमन शाखा त्यांनी निवडली होती. आयटीआयमध्ये मुली केवळ नावापूरत्याच होत्या. त्यामुळे सुरुवातीला त्यांचे मन लागले नाही. आयटीआय करायचेच नाही, असे त्यांना वाटू लागले. परंतु वडिलांनी हिंमत दिली. कोराडी पॉवर हाऊस येथे अप्रेंटिसशिप केली. पुढे नांदेड विभागात वीज विभागाच्या जागा निघाल्या. अरुणा यांनीही अर्ज केला. परीक्षा दिली आणि २०१३ मध्ये विद्युत सेवक म्हणून त्यांची निवडही झाली. हिंगोली येथील औंढा नागनाथ येथे त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली. त्या एकदा वीज चोरी पकडण्यासाठी गेल्या. वीज चोरणारे महिलांना पुढे करतात. म्हणून अरुणा व त्यांच्यासोबत आणखी एक मुलगी अशा दोघींना पुढे पाठवण्यात आले. तेव्हा एक जण घरातूनच थेट आकडे टाकून वीज चोरी करीत असल्याचे दिसून आले. दोघींना पाहून त्याने आतूनच दार बंद केले. तेव्हा कसेबसे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलावून स्वत:ची सुटका करून घेतली. परंतु लहानपणापासूनच जीवनात काहीतरी वेगळे करायचे, असे ठरवल्याने आपण हे काम अगदी आनंदाने करतो असे त्या ठामपणे सांगतात.
पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान देणारी नागपुरातील अरुणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 11:23 AM