लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या विशेष पथकासह विकासाचे ‘नागपूर मॉडेल’चा अभ्यास करण्यासाठी २७ व २८ जानेवारीला संत्रानगरीत येणार आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते शहरातील विविध विकास प्रकल्पांना भेटी देऊन अभ्यास करणार आहेत.केजरीवाल यांच्या नागपूर दौऱ्यातील कार्यक्रमाचा विचार करता ते शहरातील विविध प्रकल्पासह मेट्रो रेल्वे, ई-चार्जिंग स्टेशन, राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित प्रकल्पांची माहिती जाणून घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम सोमवारी जिल्हा प्रशासन व महापालिकेला मिळाल्याची माहिती आहे. २७ जानेवारीला दुपारनंतर ४.४५ ला त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. अर्धातास विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता विमानतळावरील ई-चार्जिंग स्टेशन, इलेक्ट्रिक टॅक्सी संदर्भात माहिती घेतील. त्यानतंर ७.३० ला इथेनॉलवर धावणाऱ्या ग्रीन बसेसची पाहणी करतील. रात्री रविभवन येथे मुक्काम करतील.दुसऱ्या दिवशी २८ जानेवारीला सकाळी १० वाजता महापालिकेच्या प्रकल्पांची माहिती घेतील. यात भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमधील दूषित पाणी प्रक्रिया प्रकल्प, त्यानंतर २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना प्रकल्पांचे आयुक्त अश्विन मुदगल सादरीकरण करतील. दुपारी १२ वाजता मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे प्रबंध निदेशक ब्रिजेश दीक्षित प्रकल्पाचे सादरीकरण करतील. एक तासानंतर एनएचआयतर्फे आयएमएस,अजनी व खापरी येथे सादरीकरण होईल. दुपारी २ ते ४ आराम करतील. त्यानंतर ४ वाजता मेट्रो रेल्वेच्या खापरी येथील स्टेशनची पाहणी करून दिल्लीकडे रवाना होतील.
प्रशासन लागले कामालादिल्ली सरकारकडून केजरीवाल यांच्या नागपूर दौऱ्याची माहिती मिळताच महापालिके चे अधिकारी सक्रिय झाले आहेत. मोजक्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या दौऱ्यावर चर्चा केली. सादरीकरण व दौऱ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. वास्तविक स्वच्छता सर्वेक्षणावरून महापालिका प्रशासन आधीच तयारीत आहे.