अरविंद वाघमारे यांनी केला न्यायालयाचा अवमान : हायकोर्टाचा निष्कर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:12 AM2019-04-04T00:12:54+5:302019-04-04T00:13:51+5:30
अॅड. अरविंद वाघमारे व इतर चौघांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नोंदवला. त्यानंतर न्यायालयाने पाचही जणांविरुद्धची फौजदारी अवमानना याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली. तसेच, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून अवमानना कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली व यावर १८ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अॅड. अरविंद वाघमारे व इतर चौघांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नोंदवला. त्यानंतर न्यायालयाने पाचही जणांविरुद्धची फौजदारी अवमानना याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली. तसेच, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून अवमानना कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली व यावर १८ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. इतर अवमानकर्त्यांमध्ये नागोराव इंगळे, त्यांची पत्नी ज्योती, मुले आशिष व नयन यांचा समावेश आहे. अवमानकर्त्यांनी बाल न्याय मंडळाचे न्यायाधीशांची गैरवर्तणूक व अवमाननाजनक कृतीची उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडे तक्रार केली होती. त्याची एक प्रत नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्तींना सादर करण्यात आली होती. १९ जून २०१८ रोजी उच्च न्यायालयाने तक्रारीतील काही गंभीर आरोप लक्षात घेता या पाचही जनांविरुद्ध स्वत:च फौजदारी अवमानना याचिका दाखल करून घेतली. त्यानंतर या कारवाईविरुद्ध वाघमारे व इतरांनी अपील दाखल केले. या दोन्ही प्रकरणांवर एकत्र सुनावणी केली जात आहे.
गेल्या तारखेला सुनावणीदरम्यान केलेल्या अवमानकारक कृतीमुळे न्यायालयाने वाघमारे यांना ताब्यात घेण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. त्यानुसार वाघमारे यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर वाघमारे यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. त्यामुळे न्यायालयाने त्यांना योग्य समज देऊन माफ केले होते. तसेच, मूळ अवमानना प्रकरण कायम ठेवून दुसरी अवमानना कारवाई मागे घेतली होती. न्यायालयात वाघमारे यांनी स्वत: बाजू मांडली. न्यायालय मित्र म्हणून अॅड. रजनीश व्यास तर, उच्च न्यायालय प्रशासनातर्फे वरिष्ठ वकील आनंद जयस्वाल व अॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.
तो अर्ज खारीज
हे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमक्ष सुनावणीसाठी ठेवण्यात यावे असा अर्ज वाघमारे यांनी दाखल केला होता. न्यायालयाने त्या अर्जावर सुनावणी घेतली व शेवटी विविध बाबी लक्षात घेता अर्ज फेटाळून लावला.