कमल शर्मा
नागपूर : एकीकडे प्रचंड विरोध सुरू असताना महावितरणने राज्यात स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याची गती वाढवली आहे. या कामासाठी नेमलेल्या एजन्सींना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. आता करार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. फेब्रुवारी २०२४ पासून मीटर बसविण्याचे काम सुरू होईल, असा दावा केला जात आहे. विदर्भाबाबत बोलायचे झाले तर येथे एकूण ५२ लाख ६ हजार ९८२ स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत.
महाराष्ट्रात सुमारे २६ हजार कोटी रुपये खर्चून स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक मीटर बदलला जाईल. एकूण २.४१ कोटी ग्राहकांचे वीज मीटर बदलले जाणार आहेत. विदर्भाबाबत बोलायचे झाले तर एकूण ५२ लाख सहा हजार ९८२ स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. नागपूर शहरात सर्वाधिक ९ लाख ४५ हजार ६२३ मीटर बसविण्यात येणार आहेत. मोबाइलप्रमाणेच यात पोस्ट पेड आणि प्रीपेडची सुविधाही असेल.
हे संपूर्ण काम खासगी कंपन्यांकडे सोपविण्यात आले आहे. विदर्भात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे मॉन्टी कार्लो आणि अमरावती, वाशिम, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा येथील जीनस कंपनीकडे स्मार्ट मीटर बसविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कंपन्यांना २७ महिन्यांत मीटर बसवावे लागणार आहेत. या कंपन्यांकडे ९३ महिन्यांच्या देखभालीचीही जबाबदारी असेल. हे मीटर बसवून ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशन्सही स्मार्ट करण्यात येणार आहेत. मात्र, स्मार्ट मीटर बसविण्यासाठी कंपन्यांनाही ‘स्मार्ट’ व्हावे लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. लवकरच डेटा सेंटर आणि जीपीएस यंत्रणा विकसित करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
जुन्या मीटरबाबत अद्याप निर्णय नाही
घरांमध्ये बसविलेल्या जुन्या मीटरचे काय होणार, याबाबत महावितरणने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, नवीन मीटर बसविण्यासाठी ग्राहकांकडून पैसे घेणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार वीज वापरण्याचा अधिकार मिळणार असल्याचे महावितरणने सांगितले. ग्राहकांना मोबाइल फोनप्रमाणे पैसे देऊन वीज वापरता येणार आहे. प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकांचे पैसे संपताच वीज पुरवठा खंडित होईल; पण किती पैसे शिल्लक आहेत, याची आगाऊ माहिती ग्राहकांना दिली जाईल.
विदर्भात कुठे आणि किती मीटर बसविले जाणार आहेत?
जिल्हा - स्मार्ट मीटर
अकोला - ३,८३,५२५
बुलढाणा - ४,६७,२८३
वाशिम - १,९२,१५१
अमरावती - ६,३२,७६७
यवतमाळ - ५,००,९१०
चंद्रपूर - ४,१४,६६७
गडचिरोली - ३,२५,६७५
गोंदिया - २,९८,३४७
भंडारा - २,९१,८८३
वर्धा - ३,९८,८०९
नागपूर शहर - ९,४५,६२३
नागपूर ग्रामीण - ३,४४,२२५