संजय रानडे
नागपूर : वन पर्यटन सुरू होऊन एक आठवडा उलटला आहे. दरम्यान, पेंच व्याघ्र प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य यासह इतर वनांमध्ये वन्यजीवप्रेमींना वाघ व इतर प्राण्यांनी हमखास दर्शन दिले. त्यामुळे वन्यजीवप्रेमी मोठ्या संख्येत वनांकडे धाव घेत आहेत.
नॅटएज्यू वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक डॉ. उमेश कृष्णा यांनी लोकमतशी बोलताना, खवासा-तेलिया बफर येथे काळा बिबट्या, लांडगे, वाघ आदी प्राण्यांचे नियमित दर्शन होत असल्याचे सांगितले. खुर्सापार, चोरबाहुली व सिल्लारी गेट पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. खुर्सापार गेट संपूर्ण भारतातील पर्यटकांना आकर्षित करते. बारस (टी-६५), बिंदू (टी-६८) आणि काही नर वाघ येथे नियमितपणे दिसतात. या वर्षी सुरुवातीला पर्यटकांचा ओघ कमी होता. परंतु, नियमित प्राणी दिसत असल्याचे कळताच पेंच पर्यटकांनी फुलून गेले, असे पेंच येथे दहा वर्षांपासून जिप्सी चालवीत असलेले दिनेश सिरसाम यांनी सांगितले.
वन्यजीव छायाचित्रकार मोनू दुबे म्हणाले, पेंच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाला महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुरिया गेटवर बिबट्या आणि खुर्सापार गेटवर वाघांच्या नियमित दर्शनाने थरार वाढला आहे. वन पर्यटन सुरू झाल्यानंतर मध्य भारतातील टीएटीआर, पेंच, कान्हा, बांधवगड व पन्ना या सर्व वनांमध्ये वाघ दिसले. त्यामुळे वन्यजीव पर्यटनाला वेग आला. परिणामी, स्थानिक व्यवसायालाही चालना मिळाली. ही बाब लक्षात घेता वन्यजीव पर्यटनाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, याकडे वन्यजीव टूर ऑपरेटर हर्षल मालवणकर यांनी लक्ष वेधले.
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणी पेंच व्याघ्र प्रकल्पासाठी हा हंगाम धमाकेदार ठरणार आहे. या प्रकल्पांच्या सर्व झोनमध्ये वाघाचे बछडे आहेत. येथे सतत वाघाचे दर्शन होत आहे. एकूणच, वन्यजीव पर्यटकांसाठी या हंगामात पेंच ही पहिली पसंती असेल, असा विश्वास पेंच येथील निसर्गतज्ज्ञ ओमवीर चौधरी यांनी व्यक्त केला.