हायकोर्टात धाव घेताच 'त्या' तिघांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: November 23, 2023 04:47 PM2023-11-23T16:47:16+5:302023-11-23T16:48:04+5:30
राज्य सीईटी सेलने प्रवेशासाठी वाटप केली महाविद्यालये
नागपूर : अन्यायाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतल्यामुळे तीन उमेदवारांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. राज्य सीईटी सेलने संबंधित उमेदवारांना बी.ए.एम.एस. अभ्यासक्रम प्रवेशाकरिता महाविद्यालये वाटप केली आहेत.
आदित्य गिरडकर (चंद्रपूर), प्राजक्ता निकम व मनुजा तुमडे (दोघीही गडचिरोली), अशी उमेदवारांची नावे आहेत. आदित्यला नाशिक जिल्ह्यातील येवला येथील मातोश्री आयुर्वेद महाविद्यालय, प्राजक्ताला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील दिगांबर भानुदासराव लोलगे आयुर्वेद महाविद्यालय तर, मनुजाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील प्रदीप पाटील आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय वाटप झाले आहे.
या उमेदवारांनी गेल्या ७ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेत चांगले गुण मिळवून बी.ए.एम.एस. अभ्यासक्रम प्रवेशाची पात्रता प्राप्त केली. त्यामुळे त्यांना सुरुवातीला गोंदिया जिल्ह्यातील कुडवा येथील एम.एस. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ॲण्ड रिसर्च सेंटरमधील जागा वाटप झाल्या होत्या. त्यानुसार हे उमेदवार महाविद्यालयात हजर झाले होते. परंतु, महाविद्यालयाने काही कारणांवरून तिघांनाही प्रवेश दिला नाही. त्यामुळे, उमेदवारांनी राज्य सीईटी सेल व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे तक्रार केली. त्याचाही काहीच फायदा झाला नाही. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
न्यायालयाने गेल्या ३१ ऑक्टोबर रोजी सीईटी सेल व आरोग्य विद्यापीठाला नोटीस जारी करून यावर स्पष्टीकरण मागितले. त्यानंतर, सेलने आवश्यक पावले उचलून तिघांसाठीही डॉक्टर होण्याचा मार्ग मोकळा केला. न्यायालयात उमेदवारांतर्फे ॲड. सोनिया गजभिये यांनी कामकाज पाहिले.