देवलापार (नागपूर) : लग्नाला घरच्यांचा विरोध असल्याने प्रेमीयुगुलाने आत्महत्या करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. यात प्रेयसीचा मृत्यू झाला तर प्रियकर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
अश्विनी रामेश्वर उईके (२२, रा. फुलझरी - जंगली) असे मृत तरुणीचे नाव आहे. अरुण सुखदास कोडवाते (२२, रा. रयतवाडी - वडांबा) असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. रामटेक तालुक्यातील रयतवाडी येथे ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण सुखदास कोडवाते हा गवंडी काम करतो. तो फुलझरी येथे कामावर जात होता. दोन वर्षांपूर्वी त्याची अश्विनीशी ओळख झाली. कालांतराने या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांना लग्न करायचे होते पण कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे अश्विनीने घरातून पळ काढला.
९ सप्टेंबर रोजी ते दोघेही रयतवाडी येथे आले. याबाबत कळताच दुसऱ्या दिवशी अश्विनीचे दोन भाऊ तिला रयतवाडी येथे भेटायला गेले. त्यांनी अश्विनीला घरी चलण्यास सांगितले. दोघांचेही विधीवत लग्न लावून देतो, असेही सांगितले. मात्र अश्विनी भावांचे ऐकून घेण्यास तयार नव्हती. यानंतर भाऊ रागाने निघून गेल्याने अश्विनी व अरुण यांच्यात वाद झाला. दोघांनीही उंदीर मारण्याकरिता घरी आणलेले औषध प्राशन केले. त्यांच्या तोंडातून फेस निघत असल्याचे अरुणच्या आईच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली.
शेजारच्यांनी त्या दोघांनाही देवलापारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मेडिकलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. सोमवारी अश्विनीची प्राणज्योत मालवली तर अरुणची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी घोडके करीत आहेत.