पाटणसावंगी (नागपूर) : रेती तस्करांनी रेतीच्या अवैध वाहतुकीसाठी नवीन फंडा अमलात आणल्याचे सावनेर पाेलिसांनी मंगळवारी (दि. १९) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सिल्लाेरी (ता. सावनेर) शिवारात केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले. यात चाेरटे टिप्परमध्ये खाली रेती आणि वर राख भरून नेत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पाेलिसांनी राख व रेतीसह टिप्पर जप्त केला.
पाटणसावंगी (ता. सावनेर) येथून धापेवाड्याच्या (ता. कळमेश्वर) दिशेने रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती सावनेर पाेलिस ठाण्याच्या पाटणसावंगी पाेलिस चाैकीतील अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी या मार्गावरील सिल्लाेरी शिवारात नाकाबंदी करून एमएच-४०/वाय -२७७५ क्रमांकाचा टिप्पर अडवला आणि झडती घेतली. सुरुवातीला पाेलिसांना त्या टिप्परमध्ये राख असल्याचे आढळून आले. मात्र, त्यांनी काळजीपूर्वक झडती घेतली असता, खाली रेती असल्याचेही निदर्शनास आले.
ती रेतीची विना राॅयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी राख, रेतीसह टिप्पर जप्त केला. या कारवाईमध्ये एकूण १० लाख ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ताे टिप्पर गुरुकृपा ट्रान्सपोर्ट मालक लक्ष्मण पावडे, रा. खापरखेडा, ता. सावनेर याच्या मालकीचा असल्याच चाैकशीत स्पष्ट झाले. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी सहायक पाेलिस निरीक्षक शिवाजी नागवे, उपनिरीक्षक विक्की लोखंडे, अशोक निस्ताने, माणिक शेरे, अंकुश मुळे, कृणाल कावळे यांच्या पथकाने केली.
घाटमालकावर कारवाई करणार का?
या प्रकरणात सावनेर पाेलिसांनी टिप्परचालक प्रेमचंद दुर्गाप्रसाद तिवारी (वय ४३, रा. दहेगाव रंगारी, ता. सावनेर) याला अटक केली. त्याने ती रेती नेमकी कन्हान नदीच्या काेणत्या घाटातून आणली, त्या घाटात रेतीचा अवैध उपसा काेण करीत आहे. याची माहिती पाेलिस घेणार का तसेच दाेघांसह टिप्पर मालकाच्या विराेधात कारवाई केली जाणार का, असा प्रश्नही सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे. पाेलिस व महसूल विभाग मूळ चाेरट्यांना पाठीशी घालत असल्याचा आराेप त्यांनी केला आहे.