निशांत वानखेडे/मेहा शर्मा
नागपूर : काेराडी ॲशपाॅण्ड फुटले, त्यानंतर आलेल्या राखमिश्रित पाण्याच्या लाेंढ्याने परिसरातील शेतकऱ्यांची सारी स्वप्नेच धुळीस मिळाली आहेत. येथील राखेचा पूर ओसरला असला तरी स्वप्नांची राख आता तेवढी मागे उरली आहे. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांपुढे आता पुढचे दिवस कसे काढायचे हा प्रश्न असला, तरी अद्यापही ठोस मदतीचा निर्णय झालेला नाही.
काेराडी वीज केंद्रातील राख साचलेल्या तलावाचा बंधारा फुटल्याने जीवितहानी झाली नसली तरी राखेच्या पुराचे दुष्परिणाम अनेक दिवस परिसरातील नागरिकांना भाेगावे लागणार आहेत. ॲशपाॅण्डमधील राखमिश्रित पाणी खसाळा, मसाळा, कवठा आदी गावांतील काही शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आणि उगवलेल्या पिकांची माती झाली. त्यातीलच एक म्हणजे दामू कुमरे. दामू यांच्यावर दाेन मुली, पुतण्या, वृद्ध आई आणि गेल्या वर्षी मृत्यू पावलेल्या भावाच्या कुटुंबाचीही जबाबदारी आहे. ज्या मालकाकडे ते शेतमजुरी करायचे, त्या शेतकऱ्याची ७ एकर जमीन ५० हजार रुपयांच्या करारावर ठेक्याने कसायला घेतली हाेती. यात त्यांनी कपाशी, तूर व अर्ध्या भागात भेंडी, दाेडके आदी भाजीपाल्याची लागवड केली. चांगले पीक हाेईल आणि कुटुंबाला सुखाची भाकर मिळेल, हे स्वप्न मनात हाेते. स्वत:जवळची जमापुंजी लावली. मात्र, राखेच्या पुराने त्यांच्या कुटुंबाची भाकरच हिरावून नेली.
लाखावर नुकसान झाले असले तरी कराराप्रमाणे ठेक्याचे ५० हजार रुपये त्यांना द्यावेच लागणार आहेत. ताे पैसा कुठून भरून द्यायचा, कुटुंबाचे पालनपाेषण कसे करायचे, अशा असंख्य विचारांचे काहूर त्यांच्या मनात चालले आहे. या जमिनीवर शेती करण्याचा विचारही केला तरी दिवाळीपर्यंत वाट बघावी लागणार आहे. त्यानंतर गहू व चणा पेरण्याचा त्यांचा विचार आहे; पण शेतात राख मिसळल्याने ते पीक कसे येईल, ही चिंताही त्यांना लागली आहे.
इतर शेतकऱ्यांचेही हेच हाल
उप्पलवाडी निवासी रामेश्वर उमाठे यांची अवस्थाही तीच आहे. त्यांनी सात एकरात पालक, चवळी भाजी, वांग्याची लागवड केली हाेती. जवळ वाहणाऱ्या नाल्यावाटे ॲशपाॅण्डचे पाणी शेतात घुसले आणि सर्व नष्ट झाले. आता शेतात निव्वळ राखेचा चिखल पसरला आहे. आता पीक येईल की नाही, ही चिंता त्यांना लागली आहे. रेल्वे अंडरब्रिजजवळ फार्महाउस असलेल्या लखबीरसिंग साेहल यांनी दीड एकरात संत्रा, माेसंबी, सीताफळ, आंबे, सागवान आदींची ४०० झाडे लावली हाेती. ती सारी झाडे राखेच्या पुराने खराब झाली आहेत. जवळच्या इतर काही शेतकऱ्यांनाही फटका बसला असल्याची माहिती म्हसाळा व कवठा गटग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद माकडे यांनी दिली.
सुपीकता यायला तीन वर्षे लागतील
तज्ज्ञांच्या मते राखमिश्रित पाण्यामुळे जमिनीची सुपीकता धाेक्यात आली असून त्यामुळे उत्पादकता घटण्याचा धाेका आहे. स्थिती पूर्वपदावर यायला किमान तीन वर्षे लागतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.