नागपूर : दोन हजार रुपये मानधनावर काम करणाऱ्या आशा वर्करची परिस्थिती कोरोना काळात वाईट झाली आहे. आशांना उपचाराची व्यवस्थादेखील करणे कठीण झाले आहे. कोरोनाच्या संक्रमण काळात फिल्डवर्क करण्यांमध्ये सर्वात अग्रेसर आशा वर्कर आहे. परंतु त्यांच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष होत आहे. आशावर्कर यांचे संघटन सीटूने सरकार व प्रशासनाला मागणी केली की आशांना या काळात आर्थिक सहकार्य व आरोग्य सुविधा पुरवावी. सीटूने दावा केला की नागपूर शहरात ७० च्या जवळपास आशा वर्कर संक्रमित झाल्या आहेत. त्यांचे कुटुंबही संक्रमित आहे. परंतु त्यांना उपचाराची कुठलीही सुविधा नाही.
संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साठे म्हणाले की शहरात किमान ९०० व ग्रामीणमध्ये ७७४ आशा वर्कर आहे. नवीन आशा वर्करला अजून मानधनदेखील सुरू झाले नाही. फक्त दोन हजार रुपये मानधनावर काम करणाऱ्या आशा वर्करना उपचाराची व्यवस्था करणेदेखील अवघड जात आहे. दुसरीकडे प्रशासन त्यांच्याकडून सर्वेक्षणाचे काम करीत आहे. त्यांना कुठलीही सुरक्षात्मक सुविधा उपलब्ध करवित नाही. संघटनेकडे दररोज आशा संपर्क करीत आहेत, त्यांच्याकडे औषधांसाठी देखील पैसे नाहीत. त्यामुळे प्रशासनाने त्यांची मदत करावी. साठे यांचे म्हणणे आहे की, आशा वर्करच्या मदतीसाठी सरकारने तत्काळ अतिरिक्त आर्थिक साहाय्यता प्रदान करावी. सोबतच उपचाराची सुविधा देण्यात यावी.