लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे हजारो वारकरी पंढरपूरला जाण्यापासून वंचित राहिले. अनेकांची वारी हुकली तरी, गावातील मंदिरात असलेल्या विठुरायाचे दर्शन घेऊन विठ्ठलभक्तांनी आपल्या मनीची आस पूर्ण केली. लॉकडाऊनच्या काळातही शेकडो भक्तांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. शहरातील सर्वच मंदिरांनी पारंपरिक सोहळे रद्द करून यंदा साधेपणाने आषाढी एकादशीचे पर्व साजरे केले.भारतमाता चौक विठ्ठल रुख्मिणी मंदिरभारतमाता चौकातील ३५० वर्षे पुरातन संत उपासराव महाराज मठामधील विठ्ठल रुख्मिणी मंदिरामध्ये शेकडो भक्तांनी दिवसभरात दर्शन घेतले. सुरक्षा आणि फिजिकल डिस्टन्स पाळून भक्तांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आला. यंदा प्रथमच मंदिराच्या वतीने साधेपणाने आषाढी एकादशीचे पर्व पार पडले. पहाटे मूर्तीला स्नान, काकडा, भजनादी कार्यक्रम करण्यात आले. सायंकाळी हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम झाला. दरवर्षी दिंडीचा प्रघात आहे. यंदा तो रद्द करण्यात आला.लक्ष्मीनारायण मंदिर (भोसलेकालीन)सक्करदरा येथील पुरातन लक्ष्मीनारायण मंदिर (भोसलेकालीन) येथे यंदा पूर्वापार परंपरांना फाटा देऊन प्रथमच साधेपणाने आषाढीचा कार्यक्रम पार पडला. पहाटे ३.३० वाजता मूर्तीला अभिषेक करण्यात आला. मूर्तीला साज चढवून तुळशीमाळांनी सुशोभित करण्यात आले. शिवलिंगाची आणि लक्ष्मीनारायण मूर्तीचीही सजावट करण्यात आली. सायंकाळी आरतीनंतर मंदिर बंद करण्यात आले. दुपारपर्यंत सुमारे ४०० वर भक्तांनी भेटी दिल्या.नबाबपुरा विठ्ठल रुख्मिणी मंदिरनबाबपुरा येथील भुतेश्वर मठामधील विठ्ठल रुख्मिणी मंदिरातही आषाढीचा कार्यक्रम पार पडला. सुमारे ८५ वर्षे पुरातन असलेल्या या मंदिरात संत नामदेव महाराज सरोदे यांच्या हस्ते नित्यपूजा आणि अभिषेक करण्यात आला. मंदिरात असलेल्या पांडुरंगाच्या आणि रु ख्मिणी मातेच्या सजीव मूर्तीची सजावट करून अभिषेक व पूजा करण्यात आली. दुपारी प्रसाद वाटप झाला. मंदिरात भाविकांना मात्र यंदा कोरोनामुळे प्रवेश देण्यात आला नाही. मंदिरातून दरवर्षी पंढरपूरला दिंडी जाते, मात्र यंदा ती रद्द करण्यात आली.प्रेमनगर हरिहर मंदिरप्रेमनगर येथील हरिहर मंदिरामध्ये असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा करून अभिषेक करण्यात आला. दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणावर आषाढीचा कार्यक्रम घेतला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे आटोपशीर कार्यक्रम झाला. दुपारी हनुमंतांच्या मूर्तीच्या प्रदक्षिणेचा औपचारिक विधी पार पडला. श्रीधर महाराज राऊत यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले. दरवर्षी येथून पंढरपूरसाठी दिंडी निघते. मात्र यंदा ती रद्द करण्यात आली.