- देवशयनी एकादशीला देवळांची कपाटे उघडली तर काहींनी पाळले निर्बंध
- वस्त्यांमधील देवळांत रंगले भजनाचे कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या धास्तीने शासनाने घातलेल्या निर्बंधाचा परिणाम म्हणून देवस्थाने टाळेबंद आहेत. सलग दुसरी आषाढी (देवशयनी) एकादशी अशाच वातावरणात पार पडली. मात्र, यंदा देवस्थानांनी स्वत:चे स्वातंत्र्य घेत भक्तांसाठी कपाट उघडले तर काहींनी शासकीय निर्बंध पाळण्याचाच निर्धार केल्याचे आज दिसून आले. दूरूनच दर्शन घेत भक्तांनी आषाढी एकादशी साजरी केली.
देव भक्तीचा भुकेला, तुम्ही कोणं हे नसे त्यास ठावे, अडचणीचे नाही त्यासी सोयरसुतक, तो जाणे भाव तुमचा... हा भाव भक्तीत रमलेल्या प्रत्येक भक्ताचा असतो. म्हणूनच देव देवळात नाही तर तो तुमच्या मनमंदिरात वसतो, असे संत महात्मे सांगून गेले. त्याच भावनेचा साक्षात्कार गेली १६-१७ महिने भक्तजन घेत आहेत. गेल्या वर्षीची आषाढी एकादशी कुलूपबंद अवस्थेत गेली आणि यंदाची आषाढीही संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेच्या आशंकेने काहिशा तशाच स्थितीत साजरी झाली. मात्र, यंदा भक्तांच्या भावनेचा विचार करत प्रशासनानेही काहीसे दुर्लक्ष केल्याने शहरातील विठ्ठल-रुखमाईची देवस्थाने उघडली गेली. भक्तांना निर्बंधासह प्रवेश दिला गेला तर कुठे अंतर राखून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. काही ठिकाणी विधिवत कार्यक्रम पार पडले आणि प्रसादाचे वितरणही झाले. वस्त्यांमधील देवस्थानांकडे प्रशासनाचे काहीसे दुर्लक्ष असल्याने नागरिकांनी भजन-कीर्तन करत आषाढी साजरी केली.
नवीन सुभेदार येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर
गेल्या वर्षी सगळे निर्बंध पाळले होते. मात्र, यंदा भक्तांना आवरणे कठीण असल्याचे दिसल्याने कपाट उघडण्यात आले. निर्जंतुकीकरणाची व्यवस्था व व्यक्तिश: अंतर पाळले जात होते. प्रसादाचे वितरणही केले गेले.
सक्करदरा तलाव येथील लक्ष्मीनारायण मंदिर
या भोसलेकालीन ऐतिहासिक मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे दर्शनाची सुविधा बॅरिकेट्स लावून करण्यात आली होती. मूर्तींची सजावट करण्यात आली होती. पहाटेची आरती झाली आणि उपवासाचा प्रसाद वितरित करण्यात येत होता.
भारत माता चौक येथील श्रीहरी विठ्ठल रुखमाई देवस्थान
या देवस्थानात वारकऱ्यांची उपस्थिती होती. नैमित्यिक पूजन, हरिपाठ, भजन-कीर्तन, हरिपाठ आदी पार पडले. भक्तांनी निसंकोचपणे विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि उपवासाच्या प्रसादाचा आनंद घेतला.
श्री पोद्दारेश्वर राममंदिर
येथे दरवर्षीप्रमाणे देवशयनी एकादशीला सुंदरकांड पाठ आणि इतर नैमित्यिक पुजाविधान पार पडले. यावेळी मोजक्या संख्येने भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येत होता.
.............