लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियन (सीटू)च्या रामटेक तालुका शाखेचावतीने मंगळवार (दि. १५)पासून बेमुदत संप पुकारला आहे. यात रामटेक तालुक्यातील बहुतांश आशासेविका सहभागी झाल्या आहेत. आशासेविकांनी शुक्रवारी (दि. १८) रामटेक तहसील कार्यालयासमाेर निदर्शने करीत तहसीलदार बाबासाहेब मस्के यांच्याकडे मागण्यांचे निवेदन साेपविले.
आशासेविका व गट प्रवर्तकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, त्यांना किमान १८ हजार रुपये दरमाह वेतन द्या, काेराेना संक्रमण काळात प्रति दिन ५०० रुपये भत्ता द्या, ईपीएफ व ईएसआयसी सेवा लागू करा या मागण्यांसाठी संप पुकारला असल्याची माहिती आशासेविकांनी दिली. या मागण्या यापूर्वी शासनाकडे करण्यात आल्या हाेत्या. मात्र, शासनाने लक्ष न दिल्याने संप करण्याची वेळ आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, त्यांच्या या संपाचा शुक्रवारी चाैथा दिवस हाेता. या काळात शासन व प्रशासनाने संपाची दखल न घेतल्याने आशासेविकांनी तहसील कार्यालयासमाेर दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत ठिय्या आंदाेलन करीत निदर्शने केली. शेवटी तहसीलदार बाबासाहेब मस्के यांच्याकडे निवेदन साेपविले. आंदाेलनात सीटूच्या तालुका सचिव कल्पना हटवार, नीता भांडारकर, छाया शेंडे, रविता बावणे, लता टेकाम, उषा शेंडे, माया लोंढे, ज्योती कडबे, सुरेखा ननोरे, करुणा पौनीकर, प्रीती सरोदे, अल्का मसराम यांच्यासह ६० आशासेविका व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.