काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षासाठीही निवडणूक घ्या; आशिष देशमुख यांनी पुन्हा साधला नेम
By कमलेश वानखेडे | Published: September 16, 2022 06:25 PM2022-09-16T18:25:12+5:302022-09-16T18:27:22+5:30
नियुक्त्यांमुळे पक्षाचे नुकसान
नागपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी ज्या पद्धतीने निवडणूक होणार आहे, त्याच पद्धतीने प्रदेश अध्यक्षपदासाठीही निवडणूक व्हावी. दोन्ही अध्यक्षांसाठी एकाच दिवशी मतदान व्हावे. काँग्रेस निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री यांनी याबाबतचा निर्णय त्वरित जाहीर करावा, अशी रोखठोक भूमिका काँग्रेस नेते, माजी आमदार आशिष देशमुख यांनी उघडपणे मांडली.
देशमुख म्हणाले, आजवर झालेल्या नियुक्त्यांमुळे काँग्रेस पक्षाची अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे आता नेमणुकीची पद्धत बंद करावी व निवडणूक घ्यावी. प्रदेश अध्यक्ष नेमण्याचे अधिकार राष्ट्रीय अध्यक्षांकडे सोपविणे हे चुकीचे आहे. एकीकडे राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक होते, तर प्रदेशाध्यक्षाची निवड करताना ती प्रक्रिया का अवलंबली जात नाही, असा सवालही त्यांनी केला. नाना पटोले हे निवडून आलेले अध्यक्ष नाहीत. त्यांची नियुक्ती झाली होती. पण आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
निवडून आलेल्या अध्यक्षाला एक वेगळे महत्व असते. लोकशाहीच्या मार्गाने काँग्रेस पक्ष जात असताना कुठेतरी या नियुक्त्या होत असतील तर त्याला खोडा लागल्यासारखं होईल. त्यामुळे, या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतील. ते होऊ नये, असे वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षही निवडून जाण्याची गरज आहे. सर्व प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कार्य समितीतील सदस्य आणि इतर पदाधिकाऱ्यांचीही निवडणुकीतून निवड करावी, असेही देशमुख म्हणाले.