Ashish Deshmukh : आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी
By कमलेश वानखेडे | Published: May 24, 2023 02:49 PM2023-05-24T14:49:51+5:302023-05-24T14:55:05+5:30
आशिष देशमुख यांच्यावर अखेर काँग्रेकडून कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या शिस्तपालन समितीने देशमुख यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्काषित केले आहे.
नागपूर : माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर अखेर काँग्रेकडून कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या शिस्तपालन समितीने देशमुख यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्काषित केले आहे. पक्ष न नेत्यांविरोधात सातत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे देशमुख यांना आधीच काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून उघडपणे पक्षविरोधी भूमिका घेत होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दरमहा एक खोका मिळतो, असा थेट आरोप त्यांनी केला होता.
पक्षाचे अ.भा. संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्यावरही टीका केली होती. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही ओबीसीच्या मुद्यावर माफी मागण्याचा सल्ला दिला होता. याची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीने गंभीर दखल घेत देशमुख यांना ५ मार्च रोजी कारणे दाखवा नोटीस बजावत निलंबित केले होेते. यावर देशमुख यांनी सादर केलेल्या उत्तराने समितीचे समाधान झाले नाही. त्यामुळे बुधवारी देशमुख यांना काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून सहा वर्षांसाठी निष्काषित करण्यात येत असल्याचा आदेश जारी करण्यात आला.
तीन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशमुख यांच्या सिव्ह्ल लाईन्स येथील बंगल्यावर जाऊन नाश्ता केला होता. ही भेट राजकीय नसल्याचेही या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले होते. पण भेटीनंतर देशमुख यांनी फडणवीस-बावनकुळे यांचे कौतुक केले. यावरून या भेटीमागचा राजकीय गोडवा स्पष्ट झाला होता.