नागपूर : अ.भा. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे सातत्याने लाड होत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या रमेश चेन्निथाला यांच्या नेतृत्वातील एक सदस्यीय समितीचा कुठलाही फायदा होणार नाही. ही समिती एक ढोंग आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया माजी आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केली.
देशमुख यांनी यावेळी थेट वेणुगोपाल यांच्यावर निशाणा साधला आहे. पटोले हे जेव्हापासून भाजप सोडून काँग्रेसमध्ये आले तेव्हापासून त्यांना काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांच्या माध्यमातून प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदापासून तर प्रदेशाध्यक्षपदापर्यंत अशी विविध आठ पदे देण्यात आली आहेत. सरकार शाबूत राहिले असते तर पटोले मंत्रीही झाले असते. वेणुगोपाल यांच्यासारखे अपरिपक्व व्यक्ती संपूर्ण देशातली काँग्रेस हाताळत आहे. त्यांच्याकडून काही सकारात्मक निर्णय पुढच्या काळात येतील अशी शक्यता दिसत नाही. ज्याप्रमाणे मागच्या सात-आठ वर्षांमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसची पीछेहाट झाली तशीच आता होईल, असेही देशमुख म्हणाले.
वेणुगोपाल हे पटोलेंच्या खिशात आहेत. पटोलेंचे धागेदोरे हे संपूर्ण हायकमांडच्या वर्तुळात आहेत. त्यामुळे नाना पाटोलेंना नक्कीच बदलण्यात येणार नाही. त्यासाठीच या कमिटीचा फार्स नेमण्यात आला आहे, असा आरोपही देशमुख यांनी केला.