नागपूर : जनतेतून निवडून येणाऱ्या प्रतिनिधीला निवडून न येणाऱ्या प्रतिनिधीने टोमणे मारणे याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. संजय राऊत यांच्या तोंडाला कुणाचेही नियंत्रण नाही. ते बोलबच्चन आहेत, अशी टीका करीत राऊत यांनी एखादी निवडणूक लढून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान शिंदे गटात सहभागी झालेले रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी दिले.
आमदार जयस्वाल हे सोमवारी रात्री मुंबईहून नागपूरला आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शिवसेनेत आमदारांपेक्षा खासदारांची अवस्था वाईट होती. पहिले खासदारांनी बंड करणे अपेक्षित होते. मात्र, आमदारांनी पहिले उठाव केला. महाविकास आघाडीची खूप मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागली.
अगोदर अरविंद सावंत यांना केंद्रातून मंत्रिपद सोडावे लागले. मोठ्या संख्येने खासदारही आमदारांसारखा निर्णय घेतील याबद्दल कोणतीच शंका नव्हती. मंगळवारी तुम्हाला सगळं चित्र दिसेल, असे सांगत आगे आगे देखो क्या होता है क्या, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.