पक्ष कमकुवत करणारे नकोच : अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:28 AM2018-07-13T00:28:10+5:302018-07-13T00:29:23+5:30
आता २०१४ सारखी परिस्थिती राहिलेली नाही. केंद्र व राज्य सरकारविषयी लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. मात्र लोकांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी त्यांच्यापर्यत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाण्याची गरज आहे. ही परीक्षेची वेळ आहे. पक्षाचा विजय होईल या ध्येयाने कामाला लागण्याची गरज आहे. पक्षाला कमकुवत करणाऱ्यांची नाही तर विजय देणाºयांची गरज आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आता २०१४ सारखी परिस्थिती राहिलेली नाही. केंद्र व राज्य सरकारविषयी लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. मात्र लोकांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी त्यांच्यापर्यत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाण्याची गरज आहे. ही परीक्षेची वेळ आहे. पक्षाचा विजय होईल या ध्येयाने कामाला लागण्याची गरज आहे. पक्षाला कमकुवत करणाऱ्यांची नाही तर विजय देणाऱ्यांची गरज आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी देवडिया काँग्रेस भवन येथे गुरुवारी शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक घेतली. तीत कामगार नेते आ.भाई जगताप, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह अनंतराव घारड, अॅड.अभिजित वंजारी, अभिजित सपकाळ, अतुल कोटेचा, अतुल लोंढे, उमाकांत अग्निहोत्री, रामगोविंद खोब्रागडे, शेख हुसैन, नरेश गावंडे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, दीपक वानखेडे, विवेक निकोसे, प्रज्ञा बडवाईक, राजू व्यास, जयंत लुटे, संदेश सिंगलकर, बडोपंत टेंभुर्णे, अॅड.अक्षय समर्थ, मालिनी खोब्रागडे, वीणा बेलगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा विकास होत असल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात औद्योगिक विकासात पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता १३ व्या क्रमांकावर गेला आहे. नोटबंदीमुळे गुंतवणूक कमी झाली. व्यापाऱ्यांना प्रचंड प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. झारखंड सारखे राज्य पुढे गेले. आता कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असे यांनाच विचारण्याची वेळ आली आहे. यावेळी चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणेही ऐकून घेतले.
आ. भाई जगताप यांनी शहर कॉग्रेसच्या तीन वर्षांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर शहर अध्यक्ष व शहर पदाधिकारी यांची प्रशंसा केली. असेच काम झाले तर आगामी निवडणूकांमध्ये कॉग्रेस यशाचे शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. अॅड. रेखा बाराहाते, दर्शनी धवड, राजेश कुंभलकर, किशोर गीद, राजू व्यास यांनी संघटन बळकटीसाठी शहर काँग्रेसची भूमिका मांडली. संचालन सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार यांनी तर आभार प्रदर्शन वीणा बेलगे यांनी केले.
यशवंत बाजीराव काँग्रेसमध्ये
यावेळी भाजपाचे माजी आमदार यशवंत बाजीराव यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
मी काम करणाऱ्याच्या पाठिशी
प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, कुणी किती काम केले याचे मूल्यांकन होत आहे. आता बूथवर किती मिळाली हे शोधणारे अॅपही आले आहे. नागपूरमध्ये दोन मोठे मोर्चे यशस्वीपणे काढण्यात आले. मला सर्व माहीत आहे. माझे काम आवडो ना आवडो, परंतु जो करतो त्याच्या पाठिशी मी खंबीरपणे उभा आहे, असे सांगत त्यांनी ठाकरे यांच्या कामाला पावती दिली.
ठाकरेंनी मांडला लेखाजोखा
यावेळी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आगामी लोकसभा -विधानसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. शहर कॉग्रेस कमेटी पूर्णपणे क्रियाशील असून बूथ कमिटी,बूथ अध्यक्ष बनविण्याचे काम ब्लॉक अध्यक्षांमार्फत तसेच शहर कॉग्रेसचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने लवकरच पूर्ण करुन एक मजबूत संघटन या शहरात तयार केले जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षातील कार्याचा आढावा त्यांनी पुस्तक स्वरुपात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे सादर केला.