नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात सुरू असलेला वाद हा पेल्यातील वादळ आहे. काँग्रेसमध्ये मोकळे वातावरण आहे. नाना पटोले माझे ऐकतात. तुमचं काय ते माहिती नाही. फक्त त्यांना समजावून सांगण्याची पद्धत जमली पाहिजे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. बबनराव तायडे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, नागपूर शिक्षक मतदार संघात उमेदवारीच्या बाबतीत कदाचित वेगळा निर्णय झाला असता; पण माजी मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार, बबनराव तायवाडे, अभिजित वंजारी यांनी फोन करून मला लक्ष देण्यास सांगितले. त्यांचे म्हणणे ऐकून घेत मी नाना पटोलेंशी फोनवर बोललो. नाना माझं ऐकतात. फक्त त्यांना समजावून सांगण्याची पद्धत जमली पाहिजे, असे सांगत नानांनी माझं ऐकलं व अडबाले यांची तिकीट जाहीर केले असेही चव्हाण यांनी सांगितले. नागपूर व अमरावतीच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. विदर्भात काँग्रेस बळकट आहे. थोडा जोर लावला तर आणखी यश मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पवारांचा हात असता तर पहाटेचे सरकार दोन दिवसात पडले नसते; अशोक चव्हाणांनी फडणवीसांवर साधला नेम
नागपूरची जागा जिंकवण्यात फडणवीसांचे योगदान
- नागपूर शिक्षक मतदार संघाची जागा जिंकविण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. जुनी पेन्शन देता येणार नाही, असे त्यांनी विधानसभेत सांगितले व त्याचा परिणाम शिक्षक व पदवीधर दोघांवरही झाला. लोक म्हणाले, भाजपपेक्षा काँग्रेस बरी, असा टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला.
केदार यांचे सूचक साकडे
- आमदार केदार हे आमदार अभिजित वंजारी यांना उद्देशून म्हणाले, सध्या दिल्ली वाऱ्यांची तयारी जोरात सुरू आहे. चव्हाणसाहेब, आता आपल्याला जबाबदारी स्वीकारावीच लागेल, असे सूचक साकडे केदार यांनी चव्हाण यांना घातले. त्यांचा रोख प्रदेशाध्यक्ष पदाकडे असावा, असा कयास उपस्थितांनी लावला.
राष्ट्रपती शासनासंदर्भात फडणवीसांनी ‘ड्राफ्ट’ केले होते राष्ट्रवादीचे पत्र
फडणवीस वेळ काळ पाहूनच स्टेटमेंट करतात
चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले, फडणवीस यांच्या वक्तव्याची पाठराखण करताना 'फडणवीस हे संघाच्या तालमीत तयार झाल्याने खोटे बोलत नाहीत' असे बावनकुळे म्हणाले. फडणवीस हे हुशार आहेत, हे आपल्यालाही मान्य आहे. ते कधी, कुठे काय बोलायचं याचा विचार करून, वेळ काळ पाहूनच स्टेटमेंट करतात यात शंका नाही. आता कसबा व चिंचवडची पोटनिवडणूक सुरू असताना त्यांनी हे विधान केले आहे, असा चिमटा चव्हाण यांनी काढला.
वृत्तपत्र, माध्यमांची स्वायत्ता कायम राहावी
बीबीसीची सर्वे करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. देशात सर्वत्र सर्वे, धाडी सुरू असतात. वृत्तपत्र, माध्यमांची स्वायत्ता कायम राहिली पाहिजे. देशाच्या लोकशाहीत हे अपेक्षित आहे, असेही चव्हाण म्हणाले.