पवारांचा हात असता तर पहाटेचे सरकार दोन दिवसात पडले नसते; अशोक चव्हाणांनी फडणवीसांवर साधला नेम
By कमलेश वानखेडे | Published: February 14, 2023 05:12 PM2023-02-14T17:12:28+5:302023-02-14T17:15:02+5:30
फडणवीस पोटनिवडणूक पाहून बोलले, अशोक चव्हाण यांनी काढला चिमटा
नागपूर : पहाटेच्या शपथविधी (फडणवीस-अजित पवार सरकार) मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या संमतीने झाला असता तर ते सरकार दोन दिवसात पडले नसते. पूर्ण पाच वर्षे चालले असते. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान चुकीचे आहे, असा सांगत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर नेम साधला.
डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी नागपुरात आले असता चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले, फडणवीस यांच्या वक्तव्याची पाठराखण करताना ‘फडणवीस हे संघाच्या तालमीत तयार झाल्याने खोटे बोलत नाहीत’, असे बावनकुळे म्हणाले. फडणवीस हे हुशार आहेत, हे आपल्यालाही मान्य आहे. ते कधी, कुठे काय बोलायचं याचा विचार करून, वेळ काळ पाहूनच स्टेटमेंट करतात यात शंका नाही. आता कसबा व चिंचवडची पोटनिवडणूक सुरू असताना त्यांनी हे विधान आहे, असा चिमटा चव्हाण यांनी काढला.
‘समझोता’वरून चंद्रशेखर बावनकुळे-अनिल देशमुख आमनेसामने
पवार यांचे समर्थन असते तर सरकार दोन दिवसात पडले नसते. त्यावेळी ही सर्व प्रक्रिया मी जवळून पाहत होतो. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करून परत बोलावले. ताकीद दिली. ही आपली भूमिका नाही, असे पटवून सांगितले. पवार यांनी पुढाकार घेतल्यामुळेच राष्ट्रवादीचे आमदार परतले व पहाटेचे सरकार पडले, असेही चव्हाण म्हणाले. नागपूर विमानतळावर चव्हाण यांचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, अनंतराव घारड, रामकिशन ओझा, अतुल कोटेचा, अभिजित सपकाळ आदिंनी स्वागत केले.
वृत्तपत्र, माध्यमांची स्वायत्तता कायम रहावी
- सर्वे करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. देशात सर्वत्र सर्वे, धाडी सुरू असतात. वृत्तपत्र, माध्यमांची स्वायत्तता कायम राहिली पाहिजे. देशाच्या लोकशाहीत हे अपेक्षित आहे, असेही चव्हाण म्हणाले.