अशोक धवड यांना हायकोर्टाचा दणका : अटकपूर्व जामीन नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 09:14 PM2019-07-31T21:14:22+5:302019-07-31T21:19:52+5:30
ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारणारे नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके चे अध्यक्ष व माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) यांना बुधवारी जोरदार दणका बसला. बँकेतील घोटाळ्यामध्ये सहभाग व अन्य बाबी लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने धवड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारणारे नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके चे अध्यक्ष व माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) यांना बुधवारी जोरदार दणका बसला. बँकेतील घोटाळ्यामध्ये सहभाग व अन्य बाबी लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने धवड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी हा निर्णय दिला. आर्थिक घोटाळे समाजात कर्करोगासारखे पसरत असून घोटाळेबाजांची संख्याही सतत वाढत आहे. त्यामुळे अशी प्रकरणे कठोरतेने हाताळणे आवश्यक आहे असे मत न्यायालयाने हा निर्णय देताना व्यक्त केले.
धवड व त्यांच्या साथीदारांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे बँक व ठेवीदारांचे मोठे नुकसान झाले. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. धवड हे अध्यक्ष म्हणून बँकेच्या सर्व व्यवहारासाठी जबाबदार आहेत. बँकेतील पैसे उचलताना नियमांचे पालन करण्यात आले नाही. धवड यांच्या दबावामुळे अवैधरीत्या मोठमोठ्या रकमा काढण्यात आल्या. तसेच, मुद्दामून कर्ज थकवणाऱ्या काही लोकांसोबत नियोजित पद्धतीने तडजोड करण्यात आली. एवढेच नाही तर, सत्र न्यायालयातून तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर धवड यांनी घोटाळ्याचा तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या सवलतीचा दुरुपयोग झाला. त्यांना २९ जून, १ जुलै व ३ जुलै रोजी सत्र न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला होता, पण ते तिन्ही तारखांना गैरहजर राहिले. या सर्व बाबी लक्षात घेता धवड यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला जाऊ शकत नाही असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले. बँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयांचा घोटाळा झाला असून या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
किरण धवड यांना दिलासा
अशोक धवड यांच्या पत्नी व बँकेच्या संचालिका किरण धवड (५९) यांना दिलासा मिळाला. घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग दिसून आला नसल्यामुळे न्यायालयाने त्यांना एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. धवड दाम्पत्यातर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर तर, सरकारतर्फे अॅड. नीरज जावडे यांनी कामकाज पाहिले.