नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या अशोककुमार ग्यानीराम ठाकरे (२६) याला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. न्या. एम. एस. आझमी यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.
आरोपीला धमकी देण्याच्या गुन्ह्यात १ वर्ष कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना ८ फेब्रुवारी २०१७ रोजी रात्री ८च्या सुमारास नारा रोडवरील वेदनगर येथे घडली. त्यावेळी पीडित मुलगी १५ वर्षे वयाची होती. आरोपीने चाकूने ठार मारण्याची धमकी देऊन मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी त्यावरून गुन्हा दाखल करून १४ फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक केली. सरकारने न्यायालयात ठोस पुरावे सादर करून आरोपीविरुद्धचे गुन्हे सिद्ध केले. याशिवाय पीडित मुलीचे बयानही आरोपीला दोषी ठरवण्यास महत्त्वपूर्ण ठरले. सरकारच्या वतीने ॲड. वर्षा साईखेडकर यांनी बाजू मांडली तर, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश साखरे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.