नागपूर : २३ नोव्हेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने शाळा, आश्रमशाळा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. पण आदिवासी विकास विभागाने १ डिसेंबर रोजी शाळा सुरू करण्याचे परिपत्रक काढले होते. पण १ डिसेंबर रोजी आश्रमशाळा सुरू झाल्या नाहीत. विशेष म्हणजे शाळा कधी सुरू होईल, यासंदर्भात कुठलेही परिपत्रक काढले नाही, सूचना दिल्या नाहीत.
१ डिसेंबर रोजी आदिवासी विकास विभागाने शाळा सुरू होईल, यासंदर्भात परिपत्रक काढले. त्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले. आश्रमशाळेत कार्यरत शिक्षकांच्या व्हॉट्सअॅपवर शाळा सुरू करण्याचे परिपत्रक पडले. पण अप्पर आयुक्त कार्यालयांतर्गत आश्रमशाळा कशा सुरू होतील, नियोजन कसे राहील, विद्यार्थ्यांची राहण्याची सोय, पालकांचे संमतीपत्र कसे मिळविता येईल, यासंदर्भात कुठलेही नियोजन अथवा आढावा झाला नाही. त्यामुळे आश्रमशाळेतील शिक्षकांकडूनही शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न झाले नाहीत.
अखेर १ डिसेंबर आला. परिपत्रकाशिवाय काहीच नियोजन नसल्याने आश्रमशाळा लॉकच राहिल्या. यासंदर्भात काही आश्रमशाळा शिक्षकांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, १ डिसेंबरला विभागाचे आश्रमशाळा सुरू करण्याचे परिपत्रक व्हॉट्सअॅपवर आले. पण नियोजनाच्या बैठका, आढावे काहीच घेतले नाहीत. १ डिसेंबर रोजी शाळा उघडणार नाही, असेही पत्र काढले नाही. त्यामुळे आम्ही संभ्रमात आहोत.
- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरू केल्या नाहीत
नागपूर प्रकल्प कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, आश्रमशाळा १३ डिसेंबरपर्यंत सुरू होणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. त्यामुळे आम्ही आश्रमशाळा बंद ठेवल्या आहेत. पण १३ डिसेंबरपर्यंत शाळा, आश्रमशाळा बंद राहणार, असे आदेश नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयांतर्गत सहा जिल्हे येतात. नागपूर प्रकल्प कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन केले. मात्र इतर प्रकल्प कार्यालयाला आश्रमशाळा सुरू करण्यासंदर्भात कुठल्याही सूचना नसल्याची माहिती आहे. विभागाने तसे पत्रही काढले नाही.