पॉप्युलर सोसायटी सुखावली : शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी नागपूर : गुरुवारी नागपुरात एकच चर्चा होती. ती म्हणजे चैतन्य या १४ वर्षीय मुलाच्या अपहरणाची. ज्या पॉप्युलर सोसायटीमध्ये तो राहत होता, तेथे तर जणू आपल्या घरातीलच मुलाचे अपहरण झाल्याचे वातावरण होते. चैतन्यचे आई-वडील आणि बहिणींची स्थिती आणखीनच बिकट झाली होती. परंतु शुक्रवारी रात्री अपहृत चैतन्य अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप घरी परतला आणि आष्टनकर कुटुबीयांना जीवनातील सर्वात सुंदर आनंद मिळाला. आष्टनकर कुटुंबीयासह संपूर्ण पॉप्युलर सोसायटी सुखावली. आष्टनकर कुटुंबीयांनी शनिवारी आनंदोत्सव साजरा केला. सुभाष आणि सुनंदा आष्टनकर या शिक्षक दाम्पत्याचा १४ वर्षीय मुलगा चैतन्य याचे गुरुवारी दुपारी त्याच्या घराजवळूनच अपहरण करण्यात आले होते. त्याचा वर्गमित्र गौरवच्या समोरच अपहरणकर्त्यांनी त्याला व्हॅनमध्ये डांबून नेले होते. आष्टनकर यांना दोन मुली आणि चैतन्य हा एकमेव मुलगा होता. एकमेव मुलाचे अपहरण झाल्याने आष्टनकर कुटुंबीय घाबरून गेले होते. मुलाचे काही बरे वाईट तर होणार नाही, ना या भीतीने त्यांना ग्रासले होते. आष्टनकर कुटुंबीयांचे संपूर्ण नातलग, ओळखीच्या व्यक्ती आणि परिसरातील नागरिकांनी आष्टनकर यांच्या घरी येऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. चैतन्य सुखरूप परत येईल, असा विश्वास दिला. चैतन्यचे वडील सुभाष आष्टनकर हे दिवसभर पोलिसांसोबतच फिरत राहिले. पोलिसांनी सुद्धा आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली. अखेर शक्रवारी रात्री चैतन्यचा शोध लागला. त्याला सुखरूप घरी आणण्यात आले. चैतन्यला सुखरूप पाहून आई वडील, बहिणींसह संपूर्ण आष्टनकर कुटुंबीयांसाठी दसरा-दिवाळीपेक्षाही मोठा आनंदाचा क्षण ठरला. आष्टनकर यांच्या घरी संपूर्ण नातलग जमा झाले होते. शनिवारी सकाळपासूनच लोकांचे येणे सुरु होते. लोक भेट देऊन विचारपूस करून मुलगा सुखरूप परतल्याबद्दल शुभेच्छाही देत होते. मंदिरात जाऊन केली पूजा चैतन्य सुखरूप परत आल्याचा आनंद सर्वांनाच होता. शनिवारी सकाळपासून मीडियाच्या मंडळींनी सुद्धा आष्टनकर यांच्या घरी गर्दी केली. दुपारपर्यंतचा वेळ हा मीडियाला मुलाखती व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यातच गेला. त्यानंतर अंघोळ करून सुभाष आष्टनकर चैतन्यला घेऊन जवळच्या मारुतीच्या मंदिरात गेले आणि तिथे पूजा केली.
आष्टनकर कुटुंबात नव‘चैतन्य’
By admin | Published: January 10, 2016 3:26 AM