हर्डीकर यांची पिंपरी-चिंचवडला बदली : लवकरच पदभार स्वीकारणार नागपूर : नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची पिंपरी-चिंचवड महापालिक ा आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी आयुक्त म्हणून सातारा येथील जिल्हाधिकारी अश्विन मुदगल रुजू होणार आहेत. गेल्या अडीच वर्षांच्या हर्डीकर यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात देशभरातील स्मार्ट सिटी शहराच्या यादीत नागपूरचा समावेश करण्यात आला. या योजनेला गती मिळाली. शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी पेंच टप्पा-४ योजना राबविण्यात आली. भांडेवाडी येथील १२० एमएलडीचा सांडपाणी पुनर्वापर प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करण्यात आला तसेच २०० एमएलडी क्षमतेचा सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. अश्विन मुदगल नवे महापालिका आयुक्त त्यांच्या कार्यकाळात स्वामी विवेकानंद स्मारकाचे काम पूर्ण करण्यात आले. सुरेश भट सभागृहाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. शहरातील सिमेंट रस्त्यांना सुरुवात करण्यात आली. तीन टप्प्यात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यातील ४०० कोटींच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, कामे प्रगतिपथावर आहेत. त्यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेला १२५२ कोटींच्या नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच हा प्रकल्प राबविला जाणार आहे. बीएसयूपी प्रकल्पाला गती मिळाली आहे. भांडेवाडी येथील प्रस्तावित कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या प्रकल्पाला मंजुरी मिळण्याचे काम अंतिम टप्प्यात आले. नागपूर शहराच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबविण्यात यश आल्याबाबत हर्डीकर यांनी समाधान व्यक्त केले.(प्रतिनिधी) असे आहेत नवे आयुक्त नागपूरचे नवे महापालिका आयुक्त अश्विन मुदगल हे २००७ च्या बॅचचे आयएएस आहेत. त्यांनी नाशिक येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केले. ते मूळचे ग्वाल्हेर येथील रहिवासी आहेत. ते सध्या सातारा येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मुदगल यांनी सातारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत उल्लेखनीय काम केले आहे. अभिनेता अमीर खान यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘वॉटर कप‘ स्पर्धेत गेल्यावर्षी (२०१६) सातारा जिल्ह्याला पहिले व दुसरे बक्षीस मिळाले. यात मुदगल यांचा सिंहाचा वाटा होता. या उपक्रमात शासकीय यंत्रणा कामाला लावून मुदगल यांनी स्वत:ही श्रमदान केले होते. त्यांच्या या कामाचे अमीर खान यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केले होते. साताऱ्यात ते चांगलेच लोकप्रिय ठरले. प्रशासनावर पकड असलेला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. कोणत्याही वादापासून दूर राहून लोकहिताची कामे करण्यावर त्यांचा भर राहिलेला आहे. मुदगल यांनी यापूर्वी सांगली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे तसेच यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून विदर्भातही काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
अश्विन मुदगल नवे महापालिका आयुक्त
By admin | Published: April 23, 2017 2:54 AM