लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दलित नाट्य चळवळीतील ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक तसेच लघुचित्रपटाचे निर्माते, दहाव्या अ. भा. दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्ष दादाकांत धनविजय याना नुकताच सोलापूर येथील अश्वघोष कलासक्त पुरस्कार जाहीर झाला. अश्वघोष कला व सांस्कृतिक रंगभूमीतर्फे हा पुरस्कार ७ जुलै रोजी त्यांना प्रदान करण्यात येणार आहेदादाकांत धनविजय यांचे १९७५ पासून आंबेडकरी साहित्य व सांस्कृतिक चळवळीत मोलाचे योगदान आहे. बालकलावंत घडविण्यापासून तर महिला नाट्य, कामगार नाट्याला त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या ‘गुलसितां’ हा लघुचित्रपट विविध देशातील महोत्सवात प्रदर्शित झाला. ‘सत्याचा विजय, गोष्ट निसर्गाची, अकिंचन’ ही नाटके प्रचंड गाजली. ‘विकल्प’ या नाटकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त आहे. ‘मृत्युदिन वा मुक्ती दिन’ या नाटकाचे धनविजय यांच्या दिग्दर्शनाखाली हजार प्रयोग केले. ‘अस्तित्व ’ या कथासंग्रहास राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. नाटकाबरोबरच सिनेसृष्टीत कथा, पटकथा व दिग्दर्शक म्हणून यशस्वी वाटचाल ते करीत आहेत. धनविजय यांच्या सोबत पटकथा लेखक गणेश चंदनशिवे, दिग्दर्शक ज्ञानेश्वर भोसले, लेखक बबनराव घरे, जयराज नायर, रामचंद्र धुमाळ यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
नागपुरातील दादाकांत धनविजय यांना अश्वघोष पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:46 PM