काेराडी (नागपूर) : सोमवार (दि. २६) पासून अश्विन नवरात्र उत्सवाला सुरुवात हाेणार असल्याने काेराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे मंदिर सज्ज झाले आहे. या काळात सलग १० दिवस मंदिरात भाविकांची मांदियाळी असते. त्या काळात भाविकांची गैरसाेय हाेऊ नये तसेच प्रत्येकाला मातेचे दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर गर्भगृह २२ तास खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टींनी दिली.
या काळात रोज मध्यरात्री ३ ते ४ वाजेपर्यंत शृंगार आरतीची तयारी, दुपारी ११.३० ते १२ आणि व सायंकाळी ७.३० ते ८ वाजताच्या दरम्यान आरती केली जाणार असल्याने गाभारा दर्शनासाठी बंद राहणार आहे. या उत्सवाच्या अनुषंगाने संपूर्ण तयार करण्यात आली असून, त्यासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी ग्रामपंचायत, महादुला नगरपंचायत, जिल्हा प्रशासन, आराेग्य विभाग, पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात आली आहे. रांगेतील भाविकांसाठी पिण्याचे पाणी, वायूविजन व पंख्यांची व्यवस्था केली आहे.
मंदिर परिसराची स्वच्छता, सुरक्षा व वाहतूक नियंत्रण यांनाही प्राथमिकता दिली आहे. मातेच्या दर्शनासाठी सर्वसाधारण व व्हीव्हीआयपी अशी वेगवेगळी प्रवेशद्वारे तयार केली असून, आजीवन अखंड ज्योती पासधारकांसाठी वेगळे प्रवेशद्वार तर देणगी शुल्क देणाऱ्या विशेष अतिथींच्या वेगळे प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहे.
विशेष अतिथी दर्शन पास
१०० रुपये देणगी देऊन विशेष अतिथी दर्शनाची व्यवस्था केली आहे. ही देणगी प्रवेशद्वारावर स्वीकारली जाईल. ऑनलाइन पद्धतीनेही प्रवेश पास प्राप्त करता येईल. त्यासाठी क्यूआर कोड, लिंक व त्या लिकंद्वारे रक्कम स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. लहानग्यांसाठी अम्युझमेंट पार्कची व्यवस्था केली आहे.
मातेचे स्वयंभू दर्शन
साेमवारी (दि. २६) पहाटे ४ ते सकाळी १० वाजेपर्यंत मातेच्या स्वयंभू दर्शनाला प्रारंभ होईल. भाविकांना स्वयंभू दर्शनाची संधी वर्षातून दोनदा प्राप्त होते. यावर्षी दाेन हजार अखंड मनाेकामना सामूहिक ज्योतीने परिसर उजळणार आहे. ज्याेतींसाठी तांब्याऐवजी मातीची भांडी तर घटासाठी रेतीऐवजी माती वापरली आहेत. यासाठी भाविकांकडून विशिष्ट शुल्क स्वीकारण्यात आला आहे.