विमानतळासमोर रास्ता रोको आंदोलन : पोलीस व आंदोलनकर्त्या महिलात वादनागपूर : शासकीय सुविधांचा लाभ मिळावा, या मागणीसाठी वर्धा रोडवरील विमानतळासमोर चक्का जाम करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आंदोलनकर्त्या निराधार, निराश्रित महिलाना पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करीत लाठीहल्ला केला. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व परिसरातील शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या गरीब, मजूर, निराश्रित, निराधार, परित्यक्त्या, नेत्रहीन आदी महिलांनी क्रांतिकारी शेतकरी महिला संघटनेच्या बॅनरअंतर्गत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान वर्धा रोडवर विमानतळासमोर आंदोलन केले. ५०० पेक्षा अधिक महिला हातात लाटणे घेऊन खासगी वाहनाने आल्या होत्या. रास्ता रोको करण्याचा या महिलांचा प्रयत्न होता. त्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेल्या मंदा ठवरे, शुभांगी पोटे, छाया दानव व इतरांना पोलिसांनी बळजबरीने ताब्यात घेतले. त्यांना अगोदर सोनेगाव व नंतर इतर ठिकाणी नेण्यात आले. नेते नसल्याने आंदोलन नेतृत्वहीन झाले. महिला नारेबाजी करीत सोनेगाव पोलीस ठाण्यात धडकल्या. त्यामुळे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली. काही वेळ दोन्हींकडून धक्काबुक्की झाली. आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करीत लाठ्या चालवल्या. यात एका आंदोलनकर्त्या महिलेचा हात रक्तबंबाळ झाला. एका महिलेच्या कडेवर लहान मुलगा होता. त्याच्या पायावरही लाठीचा मार बसला. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या या महिलांना मुख्यमंत्र्यांना भेटून आपले निवेदन द्यायचे होते. परंतु त्यांना ना मुख्यमंत्र्यांना भेटू देण्यात आले, ना कुणी त्यांना भेटायला आले. सायंकाळी उशिरापर्यंत या महिला ठाण मांडून होत्या. परंतु त्यांना एकही लोकप्रतिनिधी भेटायला आला नाही. अशा होत्या मागण्या...आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांमध्ये शासकीय योजना लागू करण्याच्या मागणीसोबतच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, सिंचन योजना लागू करावी, शेतकऱ्यांच्या मालासाठी शेतकऱ्यांनाच बोली लावू द्यावी, कर्जमाफी मिळावी, वृद्ध शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना, विधवा महिलांचे पुनर्वसन, मुलगी झाली म्हणून पतीने सोडलेल्या महिलांसाठी धोरण तयार व्हावे, विदर्भातील बेरोजगारांना नोकरी मिळावी, मालकी हक्काचे पट्टे आदी मागण्यांचा समावेश होता.
अधिकार मागितला; लाठ्या मिळाल्या
By admin | Published: April 03, 2016 3:52 AM