नागपूर : आर्थिकदृष्टया सक्षम असतानाही आरक्षण मागणे ही माझ्या मते लाचारी आहे. मी स्वत: प्रतिकूल परिस्थितीत असताना आरक्षणाचा लाभ घेतला. परंतु सक्षम झाल्यावर मात्र स्वत:हून आरक्षण नाकारले. आता प्रत्येकच जातीला आरक्षण हवे आहे. त्यामुळे ज्यांनी आधी आरक्षणाचा लाभ घेतला ते आता उच्चवर्णीय झाले की काय असे वाटायला लागले आहे, असे प्रतिपादन भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. मारवाडी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत यांना शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
शंकर नगरातील साई सभागृहात रविवारी आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, काँग्रेसचे नेते सतीश चर्तुवेदी उपस्थित होते. शिंदे पुढे म्हणाले, दत्ता भगत हे केवळ एका व्यक्तीचे नाही तर विचाराचे नाव आहे. त्यांनी आपल्या नाटकांच्या माध्यमातून वैचारिक समाजजागृती केली. परंतु समाज आजही बदललेला दिसत नाही. बाबासाहेबांनी काळानुसार बदलायला सांगितले होते. परंतु आजही काही लोक आधीच्या पिढीवर झालेल्या अन्याय-अत्याचाराचेच भांडवल करीत असतात. हे थांबले पाहिजे. ज्या व्यवसायामुळे आपली जात कळत असेल तो व्यवसायच सोडून दिला पाहिजे. दत्ता भगत हे नाटयसंमेलनाचे अध्यक्ष झाले. परंतु त्यांनी कधी त्यासाठी वशीला लावला नाही. साहित्य संमेलनात मात्र यासाठी भांडणे होत असतात.
नाटक हा माझ्याही आवडीचा विषय आहे. विद्यार्थी दशेत असताना मी नाटकात स्त्रीपात्र करायचो. राजकारणात तर नाटक ही कला जणू अनिवार्यच आहे, याकडेही त्यांनी मिश्कीलपणे लक्ष वेधले. संविधान दिनी दत्ता भगत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने विशेष आनंद झाला, अशी प्रतिक्रिया डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केली. विकास सिरपूरकर म्हणाले, दत्ता भगत यांनी आपल्या नाटकातून आंबेडकरी विचारांची मांडणी केली. मारवाडी फाऊंडेशनने या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. या कार्यक्रमाला सत्यनारायन नुवाल यांच्यासह मारवाडी फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.