लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुजरातच्या एका कंपनीत नोकरीची मुलाखत देण्याकरिता तुम्हाला निवडण्यात आले आहे. तुम्ही १० रुपये आॅनलाईन ट्रान्सफर करा, असे सांगून एका ठगबाजाने संबंधित व्यक्तीला ९८ हजारांचा गंडा घातला. ७ आॅगस्टला घडलेल्या या फसवणुकीची तक्रार थावराबाई सांजाभाई डामोर यांनी कोराडी पोलिसांकडे नोंदवली.डामोर यांनी नोकरीच्या संबंधाने त्यांचा बायोडाटा आॅनलाईन अपलोड केला होता. ७ आॅगस्टच्या दुपारी ३.३० वाजता त्यांना ७८३६८७ ०७०७ क्रमांकाच्या मोबाईलधारकाने फोन केला. तुमचा बायोडाटा स्पॉट लिस्टेड झाला आहे. तुम्हाला व्हिनस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. अहमदाबाद (गुजरात) या कंपनीमध्ये मुलाखत देण्याकरिता बोलविले जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला १० रुपये आॅनलाईन ट्रान्सफर करावे लागेल, असे सांगून आरोपीने एक खाते क्रमांक डामोर यांना पाठविला. केवळ १० रुपये पाठवावे लागत असल्यामुळे फारसा विचार न करता डामोर यांनी आरोपीच्या खात्यात १० रुपये ट्रान्सफर केले. पुढच्या २९ मिनिटानंतर त्यांच्या खात्यातून ९८,१५९ रुपये आरोपीने ट्रान्सफर करून घेतल्याचे डामोरच्या लक्षात आले. राजस्थानमधील कोटा येथील आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून आरोपीने रक्कम काढल्याचेही स्पष्ट झाले. आरोपीने नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने त्यांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
१० रुपये ट्रान्सफर करायला सांगून ९८ हजार रुपये लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 10:42 PM
गुजरातच्या एका कंपनीत नोकरीची मुलाखत देण्याकरिता तुम्हाला निवडण्यात आले आहे. तुम्ही १० रुपये आॅनलाईन ट्रान्सफर करा, असे सांगून एका ठगबाजाने संबंधित व्यक्तीला ९८ हजारांचा गंडा घातला. ७ आॅगस्टला घडलेल्या या फसवणुकीची तक्रार थावराबाई सांजाभाई डामोर यांनी कोराडी पोलिसांकडे नोंदवली.
ठळक मुद्देआॅनलाईन चिटिंग : कोराडी ठाण्यात तक्रार, गुन्हा दाखल