लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सात भावंडामधून ‘ते’ सहाव्या क्रमांकाचे. वडील विठोबा मिल कामगार होते. अठराविश्व दारिद्रयाचे ग्रहण घराला कायम लागलेले. पोटाची खळगी भरण्यासाठी सारेच भाऊ कायम श्रमाला जुंपलेले. याच क्रमात ‘तो’ही हंसापुरीच्या कारखान्यातून आईस्प्रोड आणून विकायचा. पण, पैसे पुरायचे नाहीत म्हणून माचिस कंपनीत काम धरले. येथील मालकाने ‘त्याला’ खालच्या जातीचा आहे, म्हणून थेट कामावरूनच काढले. हा ‘त्याच्या’ अस्मिेतवरचा पहिला आघात. त्यानेच विद्रोहाची ठिणगी मनात पेरली अन् आईस्प्रोड विकणाऱ्या याच मुलाने आपल्या लेखनीला शस्त्र बनवून अवघ्या समाजाची अस्मिता जागवली. या मुलाचे नाव होते गंगाधर पानतावणे. मंगळवारी त्यांचे निर्वान झालेअन् त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेल्या संघर्षगाथेतून त्यांच्या नागपुरातील वास्तव्याचा खडतर प्रवास नव्याने अधोरेखित झाला. नागपूरच्या पाचपावली वस्तीत १९३७ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब आजही त्या घरी राहते. त्यांचे पुतणे सुरेश पानतावणे यांनी लोकमतशी बोलताना गंगाधर पानतावणे यांच्या आठवणी सांगितल्या. वडील विठोबा मिल कामगार होते. मात्र शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. पाचपावलीत आजही उभी असलेली एससीएस मुलींची शाळा सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पानतावणेंनी अपार कष्ट करतानाही वाचनाची आवड जपली. डॉ. बाबासाहेबांचे मुकनायक मधील लेख ते आवर्जुन वाचायचे. संत तुकाराम, संत चोखामेळा यांचे अभंग त्यांना मुखोद््गत होते. नागपूरला शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या नेत्यांचे व्याख्यान असले की सर्व काम सोडून ते हजेरी लावायचे. बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेतली तेव्हा लाखो अनुयांयामध्ये त्यांचाही सहभाग होता. त्यांचे मोठे बंधू सदाभाऊ हिंदू महासभेच्या कार्यात सहभागी झाल्याने सर्व कुटुंबीयांनी त्यांच्याशी नाते तोडल्याची आठवण सुरेश यांनी सांगितली. डॉ. पानतावणे यांना पाचपावली वस्तीविषयी विशेष आपुलकी होती. बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांनी ‘माणुसकीचे बंड’ या नाटकाचे लेखन करून मित्रांसोबत वस्तीमध्ये सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. भाऊ लोखंडे व प्रा. रणजित मेश्राम यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. भाऊ व त्यांचे सहकारी त्यांना गुरू म्हणायचे. त्यांच्या खोलीमध्ये राहून शिक्षण घेतल्याची आठवण त्यांनी जागवली. असे हे माणूस घडविणारे विद्यापीठ आज काळाच्या पडद्याआड गेल्याने जगभरातील त्यांच्या चाहत्यांसह नागपूरही हळहळले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने पाचपावली तर सुन्न झाली होती.
आईस्प्रोड विकणाऱ्या मुलाने जागविली समाजाची ‘अस्मिता’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:17 AM
‘तो’ही हंसापुरीच्या कारखान्यातून आईस्प्रोड आणून विकायचा. पण, पैसे पुरायचे नाहीत म्हणून माचिस कंपनीत काम धरले. येथील मालकाने ‘त्याला’ खालच्या जातीचा आहे, म्हणून थेट कामावरूनच काढले. हा ‘त्याच्या’ अस्मिेतवरचा पहिला आघात. त्यानेच विद्रोहाची ठिणगी मनात पेरली अन् आईस्प्रोड विकणाऱ्या याच मुलाने आपल्या लेखनीला शस्त्र बनवून अवघ्या समाजाची अस्मिता जागवली.
ठळक मुद्देकुटुंबीयांनी सांगितली संघर्षगाथा : गंगाधर पानतावणेंचे आयुष्य ठरले पथदर्शक