लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आकाशातील अतिशय विलाेभनीय दृश्य मंगळवारी खगाेलप्रेमींनी अनुभवले. कायम आकर्षित करणारा चांदाेबा आज अधिक जवळ आणि मनमाेहक वाटत हाेता. त्याचे कारण म्हणजे ताे आहेच जवळ. त्याच्या परिक्रमेनुसार ताे आज सर्वात कमी ३,५६,५०० किमी अंतरावर आहे. त्यातच चैत्र पाैर्णिमा असल्याने ताे आणखी लक्षवेधी ठरला. यालाच खगाेलशास्त्राच्या भाषेत सुपरमून किंवा पिंकमून असेही म्हटले जाते.
चंद्र हा पृथ्वीभाेवती वर्तुळाकार नाही तर लंबगाेलाकार गतीने फिरत असताे. म्हणजे कधी ताे जवळ येताे तर कधी दूर जाताे. सध्या ताे पृथ्वीच्या अगदीच जवळ आला आहे. त्यामुळे ताे १० पट माेठा आणि ३० पट तेजस्वी दिसत आहे. चैत्र पाैर्णिमा असल्याने ताे अपेक्षेपेक्षा अधिक माेठा आणि पिंक वाटत आहे. याला फुलमूनही म्हणतात. हे दृश्य बुधवारी रात्रीही असेच दिसणार आहे, हे विशेष. सूर्यास्तापासून सूर्याेदयापर्यंत ते तुम्ही पाहू शकता.