नागपूर : टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितले म्हणून बार व्यवस्थापक आणि वेटरने ग्राहकाशी वाद घालून त्यांना बेदम मारहाण केली. यात धामणगावच्या एका तरुणासह तिघे जबर जखमी झाले. सक्करदऱ्यातील तिरंगा चौकात असलेल्या मॉडर्न बारमध्ये गुरुवारी दुपारी ३.३० ला ही घटना घडली. लक्ष्मी कॉलनी धामणगाव-रेल्वे (जि. अमरावती) येथील सूरज मोरेश्वर चोपडे (वय २४) आणि त्याचे काही मित्र गुरुवारी दुपारी मॉडर्न बारमध्ये बसले होते. मद्याचा आस्वाद घेताना त्यांच्या गप्पागोष्टी रंगल्या. बारमधील टीव्हीचा आवाज जास्त असल्याने त्यांच्या गप्पात व्यत्यय येत होता. त्यामुळे एक दोनदा त्यांनी वेटरला टीव्हीचा आवाज कमी करण्याची सूचना केली. ती दुर्लक्षित झाल्यामुळे संतापलेल्या एकाने बारच्या काऊंटरवर बसलेल्याला जोरात आवाज देऊन टीव्ही बंद करण्यास सांगितले. त्यावरून वेटर आणि चोपडेच्या मित्रात वाद सुरू झाला. तो वाढतच गेला. चोपडे आणि मित्र गरम भाषा वापरत असल्यामुळे बारमधील वेटर तसेच अन्य गोळा झाले. त्यांनी समोरचे दार बंद केले आणि चोपडे तसेच त्याच्या मित्राला बदडणे सुरू केले. एकाने चोपडेच्या मित्राच्या डोक्यावर लोखंडी रॉड हाणला. त्यानंतर मारतच त्यांना बारबाहेर काढण्यात आले. पोलिसांनी बारमधील अभिजित शाहू, व्यवस्थापक लोकेश राजेंद्र ठाकरे, चैनलाल पारधी, कदम बाबाजी आणि तुंगा नावाचा पान टपरीवाला या पाच आरोपींवर गुन्हा दाखल केला. कुणालाही अटक झालेली नव्हती.
बारमध्ये ग्राहकाला बेदम मारहाण
By admin | Published: March 12, 2016 3:26 AM