नागपूर - चांगले रहा, वर्तन सुधरवा, असा उपदेश दिल्यावरून झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी चार अल्पवयीन आरोपींनी कट रचून एका सामाजिक कार्यकर्त्याची भीषण हत्या केली. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबागमध्ये गुरुवारी पहाटेच्या वेळी ही थरारक घटना घडली. सुनील रामाजी जवादे (वय ४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते समता सैनिक दलाचे निमंत्रक होते.
रामबागमध्ये राहणारे जवादे कॉटन मार्केटच्या भाजीबाजारात व्यवसाय करायचे. त्यामुळे त्यांची दिनचर्या पहाटेच सुरू व्हायची. हे काम करतानाच ते सामाजिक कार्यात सक्रिय राहायचे. परिसरातील मुलांनी चांगले शिकावे, चांगली कामे करावी, यासाठी ते नेहमीच त्यांना सल्ला, उपदेश द्यायचे. काही दिवसांपूर्वी त्यांनी रामबागमध्येच राहणारे अल्पवयीन आरोपी नशा करताना दिसल्याने त्यांची कानउघाडणी केली होती. चांगले शिक्षण घ्या, काम करा, असा उपदेशही त्यांनी आरोपींना दिला होता. त्यावरून आरोपींसोबत त्यांचा वाद झाला होता.
चारचाैघात जवादे यांनी कानउघाडणी केल्याने नशेडी असलेले आरोपी जवादे यांच्यावर खुन्नस धरून होते. बुधवारी मध्यरात्री १५ ते १८ वयोगटातील हे चार आरोपी नशा करू लागले. हे करतानाच त्यांनी जवादेच्या हत्येचा कट रचला. १७ वर्षीय मुख्य आरोपीने घातक शस्त्र जमविले अन् मिरची पावडरही आणली. एकाच वस्तीत राहत असल्याने जवादे पहाटे ४ ते ५ च्या सुमारास भाजी बाजारात जाण्यासाठी घराबाहेर पडतात, याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे जवादेच्या मार्गावर आरोपी दबा धरून बसले. जवादे घरापासून काही अंतरावर येताच आरोपींनी त्यांच्यावर मिरची पावडर फेकली. डोळ्यात मिरची गेल्याने हतबल झालेल्या जवादेंवर आरोपींनी घातक शस्त्रांचे सपासप घाव घातले. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. ते पाहून आरोपी पळून गेले.
परिसरात तणाव
जवादे यांचे नातेवाईकही पोहचले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यातील जवादेंना मेडिकलमध्ये नेले. मात्र, जवादेंना डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, हाकेच्या अंतरावर असलेल्या इमामवाडा ठाण्यात जवादेंचा पुतण्या पोहचला. त्याने हत्येची माहिती देताच पोलिसांचा ताफा तिकडे धावला. त्यांनी १५ ते १६ वयोगटातील दोन आरोपींना सकाळीच ताब्यात घेतले. दरम्यान, सामाजिक कार्यात अग्रेसर राहणाऱ्या जवादेंच्या हत्येची वार्ता कळताच परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. ते कळल्यामुळे अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त नुरूल हसन यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना अटक करण्यासाठी इमामवाडा पोलिसांना आवश्यक ते निर्देश दिले.
फरार आरोपी गोंडखैरीत जेरबंद
हत्या केल्यानंतर चाैकातील ऑटोने मुख्य अल्पवयीन आरोपी आणि त्याचा एक साथीदार अमरावती मार्गाने पळून गेल्याचे कळताच पोलीस उपनिरीक्षक दीपक ठाकरे, हवलदार परमेश्वर कडू, नायक रवींद्र राऊत, सुनील रेवतकर, संदीप, शिपाई अमित पत्रे, किशोर येऊलकर, विशाल यांनी तिकडे धाव घेऊन गोंडखैरीत त्यांना जेरबंद केले. ते नशेत टुुन्न होते. वृत्त लिहिस्तोवर या चारही आरोपींची चाैकशी सुरू होती.
---