लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रसूत होत असलेल्या महिलेने डॉक्टरचा हात पकडला म्हणून तिच्या गालावर थप्पड मारल्याचा प्रकार डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात घडला. या संदर्भातील तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांनी शुक्रवारी वैद्यकीय अधीक्षकांकडे केल्याने खळबळ उडाली. आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी या प्रकरणाला गंभीरतेने घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.प्राप्त माहितीनुसार, २० वर्षीय महिला पहिल्या प्रसुतीसाठी डागा रुग्णालयात दाखल झाली. गुरुवारी तिला प्रसुती वेदना सुरू झाल्या. तिला प्रसुती कक्षात घेऊन गेले. डॉक्टर प्रसुतीसाठी मदत करीत असताना त्या महिलेने डॉक्टराचा हात पकडला. त्याचवेळी त्या डॉक्टरने तिच्या कानशिलावर हाणली, अशी तोंडी तक्रार महिलेच्या नातेवाईकांनी शुक्रवारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर यांच्याकडे केली.प्राप्त माहितीनुसार, डॉ. पारवेकर यांनी या तक्रारीची स्वत:हून चौकशी केली असता, यात असे आढळून आले की, महिलेला प्रसुती वेदना सहन होत नसल्याने तिने डॉक्टराचा हात पकडला. डॉक्टर आपल्या कामात व्यस्त असल्याने तो होत झिडकारला. यामुळे तिचाच हात तिच्या गालाला जोरात लागला. परंतु यातील नेमके खरे काय, या विषयी कुणीच बोलायला तयार नाहीत. या संदर्भात सीमा पारवेकर यांना संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता. उपसंचालक डॉ. जयस्वाल यांना विचारणा केली असता, त्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले.