नागपूर : शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून गुन्हेगारांवर वचक आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात गुंड मोकाटच असल्याचे चित्र आहे. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बँक व्यवस्थापकावर हल्ला करत त्याला लुटण्याचा प्रयत्न झाला. इतकेच नाही तर त्यांच्यावर चाकूने वारदेखील करण्यात आले.
कुंदन हुमणे (५५, फुलमती ले आउट) हे बँक ऑफ बडोदा येथे व्यवस्थापक आहेत. रविवारी सायंकाळी ते मित्राकडे जाण्यासाठी दुचाकीवर निघाले. त्यांच्या घराजवळच रस्त्यावर दोन ते तीन युवक मोपेडवर उभे होते. हुमणे त्यांच्याजवळ पोहोचताच त्यांना आरोपींनी अडविले व थेट त्यांच्या मानेला शस्त्र लावत शिवीगाळ सुरू केली. एका आरोपीने त्यांच्या खिशात हात घालत पैसे व दुचाकीची चाबी काढून घेतली. तसेच मोबाइल हिसकविण्याचा प्रयत्न केला. मात्र हुमणे यांनी विरोध केला असता एकाने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. हुमणे यांनी हिंमत दाखवत चाकू दोन्ही हातांनी पकडला व यात त्यांचा हात जखमी झाला. यामुळे आरोपी गोंधळले व या संधीचा फायदा घेत हुमणे तेथून निसटले.
परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर हुमणे हे दुचाकीजवळ गेले. आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी रेकॉर्डमधील काही जणांचे फोटो दाखविले असता एक आरोपी रोहित डेकाटे असल्याचे स्पष्ट झाले. हुमणे यांच्या तक्रारीवरून डेकाटे व त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.