नागपूर : गर्लफ्रेंडच्या वादात एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना जरीपटकातील समतानगरात घडली. जखमी झालेला मंगेश लाढे (२७) हा समतानगरातील असून, पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मंगेश एका खाजगी कंपनीत प्लंबरचे काम करतो. मागील काही दिवसांपासून पानठेला चालविणाऱ्या चिराग ठाकूर याच्याशी त्याचा वाद सुरू होता. चिरागची एक गर्लफ्रेंड आहे. तिच्यावरून या दोघांमध्ये वाद होता. या विषयावरून काही दिवसांपूर्वी मंगेशच्या साथीदारांनी चिरागला समज दिली होती. यामुळे तो नाराज होता. त्याला सकाळी ११.३० वाजता मंगेश बाइकवरून जाताना दिसला. समतानगर नाल्याजवळ चिराग आणि त्याचा साथीदार टिन्या यांनी मंगेशला अडविले. धारदार शस्त्राने मंगेशवर हल्ला केला. या घटनेनंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांनाही ताब्यात घेतले. संबंधित गर्लफ्रेंडसोबत चार महिन्यांपूर्वीच आपली मैत्री तुटल्याचे चिरागने पोलिसांना सांगितले. घटनेच्या वेळी चिराग आणि टिन्या नशेमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतत खुनाच्या आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. ९ मे रोजी मटनचे दुकान लावण्यावरून भरदिवसा जगदीश मदणे (४७) यांचा खून करून त्यांचा भाचा शुभम शेंडे (२३) याला जखमी करण्यात आले. आरोपींनी मदने यांच्या दुकानासमोरच ठेला लावून मटन विक्री सुरू केली होती. पोलिसांनी दुकान बंद करायला लावल्यावर मदने आणि आरोपींमध्ये वाद झाला. त्यात ही खुनाची घटना घडली.
तीन महिन्यांत जरीपटका परिसरात खुनाच्या पाच, तर खुनाच्या प्रयत्नाच्या तीन घटना घडल्या. लॉकडाऊन असल्याने नागरिक घरातच आहेत, तर गुन्हेगार रस्त्यावर उतरून खून वाहवत आहेत. यामुळे जरीपटका पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही घटना गंभीरपणे घेतली आहे.