लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय रस्ते सुरक्षा मूल्यमापन ही काळाची आवश्यकता आहे. या कार्यक्रमांतर्गत देशातील २१ हजार किलोमीटरच्या रस्त्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. शिवाय सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे तांत्रिक उन्नतीकरण करण्यात येत आहे. या उन्नतीकरणामुळे रस्ते अपघातांमध्ये ५० टक्क्यांची घट होईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
भारत आणि आॅस्ट्रेलिया या दोन्ही देशांकडून रस्ते सुरक्षा क्षेत्रात अगोदरपासून संयुक्तपणे काम करण्यात येत आहे. या सहकार्यातूनच लोकांसाठी रस्ते सुरक्षा आणि जागरूकता अभियान राबविण्यात येत आहे. २०३० पर्यंत शून्य रस्ते अपघाताचे आमचे लक्ष्य आहे. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी मंत्रालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमासाठी जागतिक बँक आणि एडीबीने सात हजार कोटी रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. सामाजिक जागरूकता आणि शिक्षण, आपात्कालीन सेवांमध्ये सुधारणा, वैद्यकीय विम्यावर अधिक भर, रुग्णालयाच्या सेवा अधिक उपलब्ध करणे यामुळे रस्ता सुरक्षेचे लक्ष्य गाठण्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहे, असेदेखील नितीन गडकरी म्हणाले.
२०१९ चा मोटर वाहन कायदा भारतातील परिवहन क्षेत्राच्या सर्व बाबींविषयी सर्वसमावेशक कायदा आहे, असेही ते म्हणाले. आॅटोमोबाईल क्षेत्र आणि एमएसएमई भारतीय अर्थव्यवस्थेचे विकास इंजिन आहेत. देशात निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा आणि सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांच्या क्षेत्रात परकीय गुंतवणूक करा, असे आवाहनदेखील त्यांनी केले.