आशिष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शालेय शिक्षण विभागाने वर्ग १० वीचे मूल्यांकन आणि ११ वीच्या प्रवेशासाठी तयार केलेले धाेरण वादाच्या भाेवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे धाेरण सुटसुटीत करण्याऐवजी आणखी गुंतागुंतीचे केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हुशार विद्यार्थ्यांना नुकसान हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वर्ग १० वीचा निकाल आंतरिक मूल्यांकनाच्या आधारावर घाेषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत निर्धारित निकषानुसार विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या आंतरिक मूल्यांकनाचे ३० गुण दिले जातील. हाेमवर्क, ताेंडी परीक्षा, प्रयाेग परीक्षेच्या आधारावर २० गुण दिले जातील. इयत्ता ९ वीच्या विषयवार अंतिम निकालाच्या आधारे ५० टक्के आणि १० वीच्या आंतरिक मूल्यांकनाच्या ५० टक्केच्या आधारे ५० गुण दिले जाणार आहेत. मात्र गेल्या वर्षीही काेराेनामुळे वर्ग ९ ची परीक्षा झाली नव्हती. काही शाळा साेडल्या तर बहुतेक शाळांमध्ये वर्ग १० वीचे ऑनलाईन व ऑनलाईन वर्गही झालेले नाहीत. अशावेळी आंतरिक मूल्यांकन काेणत्या आधारे करणार, हा माेठा प्रश्न आहे. दुसरीकडे वर्ग ११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याची घाेषणा केली, पण तीही ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. मात्र ११ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही सांगितले गेले आहे. त्यांचा प्रवेश झाल्यानंतरच रिक्त जागांवर सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. मात्र ११ वीच्या प्रवेशाची प्रक्रिया कधीपर्यंत चालणार, सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांचे किती राऊंड हाेतील, एखाद्या महाविद्यालयात जागा शिल्लक राहिल्या नाही तर विद्यार्थ्यांना प्रवेश कसा मिळणार, असे अनेक प्रश्न उपस्थित हाेत आहेत. हे प्रश्न यासाठी कारण, ११ वीत प्रवेश घेताना विद्यार्थी घराजवळच्या महाविद्यालयांना प्राधान्य देत असतात. शिक्षण विभागाच्या या धाेरणामुळे विद्यार्थ्यांना दूरवरच्या महाविद्यालयात जावे लागणार आहे.
सीबीएसई व आयसीएसईचे विद्यार्थी कुठे जाणार?
शालेय शिक्षण विभागाने ११ वीचे प्रवेश घेताना सीबीएसई, आयसीएसई व ओपन स्कूल बाेर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी काय निकष असणार, हे स्पष्ट केले नाही. या विद्यार्थ्यांना सीईटी द्यावी लागणार की नाही, या विद्यार्थ्यांसाठी काेणता अभ्यासक्रम असेल, या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या आधारावर सीईटी द्यावी लागणार, अशा अनेक प्रश्नांचे उत्तर स्पष्ट नाही.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी धाेरण स्पष्ट नाही
ग्रामीण व दूरवरच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी काय धाेरण आहे, हेही स्पष्ट नाही. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ११ वीत प्रवेश कसे मिळाणार, हा प्रश्नच आहे. या विद्यार्थ्यांचे ९ वी व १० वीचे मूल्यांकन कसे हाेणार, हा सुद्धा यक्षप्रश्न आहे.