लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोळसा खाण वाटप प्रकरणात चौकशी सुरू असलेल्या एका प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) मंगळवारी नागपुरातील टॉपवर्थ ऊर्जा अॅण्ड मेटल्स लिमिटेडची (पूर्वीची श्री वीरांगणा स्टील लि.) १६९.६४ कोटींची संपत्ती जप्त केल्याची माहिती आहे. यामध्ये कंपनीची कृषी व अकृषी जमीन, मशीनरी, जमीन आणि इमारतीचा समावेश आहे.
भादंविच्या अनेक संबंधित कलमांखाली टॉपवर्थ ऊर्जा अॅण्ड मेटल्स लिमिटेड आणि त्याच्या संचालकांविरूद्ध केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे विभागाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत अंतर्गत चौकशी सुरू केली होती.
कंपनीने फसवणुकीच्या मार्गाने मार्की मांगली-२, ३ आणि ४ कोळसा खाणींचे वाटप करून घेतले. कंपनीने या खाणींतून २०११-१२ ते २०१४-१५ या कालावधीत अवैध मार्गाने ९,२१,७४८ मेट्रिक टन कोळसा काढला आणि अवैध मिळकत मिळविली. या वाटप झालेल्या मार्की मांगली-२ आणि मार्की मंगली-३ कोळसा खाणीतून कोळसा काढून कंपनीने ५२.५० कोटींचे उत्पन्न मिळविले. पुढे, कॅप्टिव्ह पॉवर प्रकल्पातून तयार झालेल्या जादा वीज विक्रीमुळे आणि जोडलेल्या ग्रीडला विकल्यामुळे कंपनीला २०.४० कोटी रुपयांचा फायदा कंपनीला झाला. याशिवाय समभाग इश्यू करून भागभांडवल गोळा केले आणि समभाग जास्त प्रीमियम दिल्याने कंपनीला ९६.७२ कोटी रुपयांचा फायदा झाला.
मार्की मांगली-२ आणि मार्की मांगली-३ कोळसा खाणींच्या बेकायदेशीर वाटपामुळे कंपनीला एकूण १६९.६४ कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत चौकशी आढळून आले. अखेर चौकशीदरम्यान सक्तवसुली संचालनालयाने कंपनीची १६९.६४ कोटींची संपत्ती जप्त केली.