कर्मचारी मेळावा : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचे प्रतिपादन नागपूर : आयुष्यभर प्रशासनात काम केल्यामुळे कर्मचारी अधिक कुशल बनतात. त्यामुळे जसजशी प्रशासकीय सेवा वाढते, त्याचप्रमाणे मनुष्यबळ अधिक कुशल बनते. त्यांच्या हाताला काम देऊन प्रशासनाला हातभार लावता येऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले. आमदार निवास येथे आयोजित अन्न व औषध प्रशासन विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, हिंगोली जिल्हा ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश जी. एच. राठोड, सेवानिवृत्त सहआयुक्त मधुकर मोहगावकर,अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शिवाजी देसाई, मोहन पाटणकर प्रमुख पाहुणे होते. यावेळी अॅड. अनिल किलोर म्हणाले, स्वत:ला सेवानिवृत्त मानू नका. यातून दैनंदिन जीवनात नकारात्मक भावना तयार होते. त्यापेक्षा सेवानिवृत्त शब्दात बदल करून सेवेचे व्रत अंगिकारा. त्यातून जगण्याची सकारात्मक मानसिकता वृद्धिंगत होते. त्यातून जगण्याला नवे बळ मिळते. यावेळी उपस्थित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सेवाकाळातील अनुभव मनोगतातून कथन केले. अन्न व औषध प्रशासन विभागातील दिवंगत अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रल्हाद खरसने यांनी प्रास्ताविक केले. वामन धोपटे यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)
कुशल मनुष्यबळाचा शासनाला हातभार
By admin | Published: October 04, 2015 3:17 AM