नागपूर : विदर्भासह राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे राज्याच्या विविध भागांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले आहेत. २ हेक्टर ते ३ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातून पिकांच्या प्राप्त नुकसानीचे अहवाल एकत्र आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी खा. कृपाल तुमाने, आ. ॲड. आशिष जयस्वाल उपस्थित होते.
महायुती राज्यात ४५ जागा जिंकणारराज्यात महायुती लोकसभेच्या ४५ जागा जिंकेल असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. एकजुटीने आणि सर्वांना विश्वासात घेऊन लोकसभेची निवडणूक तिन्ही पक्ष लढविणार आहोत. त्याच्या अनुषंगाने अजित पवार यांनी कर्जत येथील राष्ट्रवादीच्या शिबिरात भाष्य केले असल्याचे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. पुढच्या सर्व निवडणुका महायुती एकत्रित लढेल असेही शिंदे यांनी सांगितले.