गरम वरणाच्या गंजात पडून बालिकेचा मृत्यू नागपूर : वरणाच्या गरम गंजात पडून होरपळल्याने एका बालिकेचा करुण अंत झाला. प्रिया सुशील माहुले (वय ५ वर्षे) असे मृत बालिकेचे नाव आहे. ती जसवंत मॉल मागे बुध्दनगरात राहत होती. पाचपावलीच्या बुद्धनगरात सोमवारी रात्री ही घटना घडली.परिसरातील एका सार्वजनिक गणेश मंडळातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. रात्री ७ च्या सुमारास आचाऱ्यांनी वरणाचा गरम गंज बाजूला करून ठेवला. बाजूलाच चिमुकली मंडळी खेळत होती. खेळता खेळता चिमुकली प्रिया गरम वरणाच्या गंजात पडून होरपळली. गंभीर अवस्थेत तिला बाजूच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू असताना प्रियाला मंगळवारी सकाळी डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली. पाचपावली पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली.चुणचुणीत प्रिया बुद्धनगर मोहल्ल्यात सर्वांची लाडकी होती. सहजपणे ती कुणातही मिसळत असल्याने घरोघरची मंडळी तिच्याशी स्रेहाने वागत होती. तिचा असा अनपेक्षित अंत झाल्याने शोककळा पसरली आहे.(प्रतिनिधी)पाचपावलीतील या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सोबतच यापुढे अशा घटना घडू नये म्हणून नागरिकांनी खास काळजी घेण्याची गरजही चर्चेला आली आहे. महाप्रसादाचा स्वयंपाक ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी लहान मुलांना जाऊ देऊ नये.अनेक ठिकाणी नेत्रदीपक रोषणाई असते. लहानगी मुले कुतूहलाने इलेक्ट्रीक वायर अथवा झगमगणाऱ्या वस्तूला हात लावण्याची भीती असते. त्यामुळे पालकांनी, स्वयंसेवकांनी मुलांना विजेच्या उपकरणापासून दूरच ठेवावे.रस्त्यावर देखावे असल्याने मोठी गर्दी जमते. बाजूनेच वाहनांची ये-जा सुरू असते. अशा ठिकाणी लहान मुलांचे हात घट्ट पकडून ठेवावे. विसर्जनाच्या ठिकाणी बालकांना पाण्याजवळ जाऊ देऊ नये. गर्दीच्या ठिकाणी मुले हरविण्याची भीती असते. त्यामुळे लहान मुलांच्या खिशात नाव आणि मोबाईल नंबर लिहून असलेली चिठ्ठी ठेवावी. घरचा रस्ता विसरला किंवा गर्दीत हरवलात तर लगेच बाजूला उभे असलेल्या पोलीस दादाजवळ जाऊन त्याला आपले नाव आणि हरविल्याची माहिती सांगण्याविषयी मुलाला सांगून ठेवावे.
सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण
By admin | Published: September 14, 2016 2:43 AM