लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात मेट्रो व रस्त्यांच्या कामांसह इतर बांधकामामुळे सतत उडणारी धूळ, जळणारा कचरा व वाढलेली थंडी, अस्थमा वाढण्यास कारणीभूत ठरले आहे. गेल्या तीन आठवड्यांमध्ये अस्थामाच्या रुग्णांत १५-२० टक्क्यांनी वाढ झाल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. यात शहरीसोबतच ग्रामीण भागातील रुग्णांचाही समावेश आहे. केवळ मेयो, मेडिकलच नाही तर खासगी इस्पितळांमध्येही रुग्ण दिसून येत आहे.धुळीचे कण, धूर, थंड हवामान, धूम्रपान अशा विविध बाबींमुळे अलीकडे अस्थमा रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सिमेंटचे जंगल म्हणून ओळख झालेल्या नागपुरातही प्रदूषणाची कमी नाही. सध्या धडाक्यात सुरू असलेले मेट्रो रेल्वे व सिमेंट रस्त्यांच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. थंडीमुळे ही धूळ खालीच राहत असल्याने याचा त्रास वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.दुसरीकडे उब येण्यासाठी मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात आहे. अनेक लोक सर्रास टायर, प्लास्टिक जाळतात. यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. यात थंडी वाढल्याने नागपुरात अस्थमा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यात लहान मुलांसोबतच वयोवृद्धांची संख्या जास्त असल्याची माहिती वरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अशोक अरबट यांनी दिली. ते म्हणाले, ज्या लोकांना अस्थमा (दमा) असतो त्यांची श्वसननलिका ही सामान्यांच्या तुलनेत जास्त संवदेनशील, प्रभावित होणारी आणि नाजूक असते. यामुळे धूळ, धूराच्या संपर्कात येताच ती आकुंचन पावून श्वसननलिकेवर सूज येते. कफ बाहेर पडतो. परिणामी रुग्णाला धाप लागते, खोकला येतो, छातीतून घरघर आवाज येतो. एकूणच श्वसनप्रक्रिया सामान्य राहत नाही यालाच अस्थमा (दमा) म्हणतात. ही लक्षणे दिसणाऱ्यांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.मेयो, मेडिकलच्या डॉक्टरांनुसार या महिन्यात बाह्यरुग्ण विभागात अस्थामाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यातील अनेक रुग्णांशी चर्चा केल्यावर त्यांनी घराच्या बाजूला सुरू असलेले बांधकाम व त्यातून निघणारी सततची धूळ, जळणारा कचरा हे कारण सांगितले आहे.
१०० मधून १५ ते २० रुग्ण अस्थमाचेदिवाळीनंतर अस्थमाच्या रुग्णांत दरवर्षी वाढ होते. या वर्षीही झाली आहे, परंतु प्रमाण वाढले आहे. धूळ प्रदूषण व थंडी याला कारणीभूत आहे. सध्या रुग्णालयात १०० रुग्णांमध्ये १५ ते २० रुग्ण अस्थमाचे येत आहेत.- डॉ. अशोक अरबटवरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट