आॅनलाईन लोकमतनागपूर : ज्योतिषशास्त्र हे पूर्वापार चालत आलेले शास्त्र आहे. ज्योतिषशास्त्राची वेगळीच ताकद आहे. ते टाकाऊ नाही. अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या निमित्ताने या शास्त्राला सामाजिक आयाम देता येऊ शकतो का? या दृष्टीने अभ्यास झाल्यास काळाच्या ओघात हे शास्त्र टिकून राहील. शास्त्राला आधुनिकतेचा टच देण्याबरोबरच समाज आणि देशाला चांगले देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत आमदार मेधा कुळकर्णी यांनी व्यक्त केले.बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळ पुणेतर्फे नागपुरात २३ वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन प्रतिभा शाहू मोडक यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले आहे. चार दिवसीय हे संमेलन कुसुमताई वानखेडे भवन येथे सुरू आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन मेधा कुळकर्णी यांच्याहस्ते झाले. यावेळी नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, आमदार सुनील केदार, नगरसेविका रूपा राय, सभापती संजय बंगाले, वराहमिहीर ज्योतिष मुक्त विद्यापीठाचे कुलपती नंदकिशोर जिचकार उपस्थित होते. यावेळी वि.वा. दिवेकर यांना जीवनगौरव, प्रतिभा शाहू मोडक यांना सहस्रदर्शन गौरव व विजय देशपांडे यांना अमृत महोत्सव गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या की, मानसिक स्वास्थ्य हरवून बसलेल्या पिढीला ज्योतिषशास्त्र मानसिक, शारीरिक व आत्मिक शांती देऊ शकते. त्यासाठी ज्योतिष आणि आध्यात्मिकतेची सांगड घालता आली पाहिजे. समाज जसा बदलतो तसे ज्योतिषशास्त्र बदलले पाहिजे असे मत रूपा रॉय यांनी व्यक्त केले. ज्योतिषशास्त्राला विज्ञानाची जोड दिल्यास आणि अनुभव व अभ्यास याची सांगड घातल्यास यातून चांगला मार्ग निघत असल्याचे प्रतिभा शाहू मोडक म्हणाल्या. अधिवेशनच्या उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन अॅड. मालती शर्मा यांनी केले. आभारप्रदर्शन ओमप्रकाश परियाल यांनी केले. अधिवेशनानिमित्ताने ज्योतिष प्रदर्शनाचे आयोजनसुद्धा येथे करण्यात आले आहे. याचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले.