- कोरोना संक्रमणाची धास्ती अन् टाळेबंदीचा अडथळा : मुसमुसल्या डोळ्यांनी नवजीवनाची प्रतीक्षा
- कुणी भेटू शकले नाही अखेरच्या समयी, कुणी स्वत: अडकल्या संसर्गात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माहेरची माती, माहेरची माणसं, माहेरचं पाणी, माहेरची माया... कधीच सोडता येत नाही, विसरता येत नाही. जुन्या परंपरेत म्हटले जाते, विवाहवेदीवर चढताना माहेरचा उंबरठा ओलांडला की, सासुरवासिनीची तिरडीच माहेराला येते. मात्र, माहेराहून वाहणाऱ्या वाऱ्याचा तो आपुलकीचा सुगंध सासुरवासिनींना हक्काचा वाटतो, तो अखेरपर्यंत. जग पालटले, परंपराही बदलल्या, विचारपरिवर्तन झाले आणि ग्लोबलायझेशनच्या या युगात काय माहेर नि काय सासर, सगळे एक झाले. असे असले तरी कोरोना संक्रमणाच्या आगमनाने पुन्हा त्याच जुन्या परंपरांची उजळणी व्हायला लागली. संक्रमणाचा फोफावलेला वेग, संसर्ग पसरू नये म्हणून लागू झालेली टाळेबंदी, स्वत: संक्रमित असल्याने आप्तांच्या सुरक्षेची चिंता... अशा सगळ्या कारणांनी सगळेच जिथल्या तिथे थबकले आहेत. स्थिती अशी की, किमान वर्षातून दोनदा तरी घडणारी माहेराची भेट आता वर्षभरापासून रखडली आहे. घटना अनेक आहेत, वेगवेगळ्या आहेत, कुठे चिंता तर कुठे वेदना आहेत.
-------------
मी पुण्यात, तर आई-बाबा नागपुरात संक्रमित
कोरोना संक्रमणाचा स्पर्श झाल्याने, पुण्याच्या घरात मी एकटी विलगीकरणात होते. माझे पती आणि मुलगी वेगळ्या खोलीत. इकडे माझी काळजी घेणे सुरू असतानाच नागपुरात आई-बाबा दोघेही संक्रमित झाले. आधीच टाळेबंदीमुळे वर्षभरापासून भेट नव्हती आणि त्यात संक्रमणाने सगळेच बेजार झाले. आता कधी एकदा टाळेबंदी संपते आणि आई-बाबांना भेटते, असे झालेय.
- श्रुती साल्फळे-देशपांडे (पुणे)
-------------
माझं माहेरच सासरी आले
संक्रमणाच्या पहिल्या लाटेत टाळेबंदी लागू झाली आणि वर्धा येथे माहेरी असतानाच मुलगा झाला. त्यानंतर पुणे येथे स्वत:च्या घरी जाणे थांबवता येणार नव्हते. अशा स्थितीत माझे आई-बाबा दोघेही पुण्यात आले. सगळे व्यवस्थित होईपर्यंत थांबले आणि परतले. कोरोना संक्रमणाची धार ओसरल्यानंतर वर्धा येथे जाण्याची तयारी असतानाच दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला आणि माहेर लांबले आहे. कधी माहेरी जाते आणि आई-बाबांना भेटते, असे झाले आहे.
- शुभांगी हुड-ढाकूलकर (पुणे)
------------
आयुष्यच थांबल्यासारखे झाले
पहिली काय नि दुसरी काय किंवा येणारी तिसरी लाट काय, सगळे आयुष्यच थांबल्यासारखे झाले आहे. वर्षातून दोनदा माहेरी येणारी मी तब्बल नऊ महिन्यांपासून माहेरचे दर्शन घेऊ शकलेली नाही. माझी मुलगी आजी-आजोबांच्या भेटीसाठी आसुसलेली असते. स्वत:चे काय सांगावे.
- स्मिता खेडकर - राळेकर (पुणे)
-------------------
श्रीलंकेत कोर्टमॅरेज, परंपरेसाठी ताटकळले
गेल्या सव्वा वर्षापासून मी श्रीलंकेत आहे. टाळेबंदी, प्रवेश बंदी आणि विलगीकरणाच्या कठोर नियमांमुळे मी नागपुरात येऊ शकलेली नाही. त्यातच लग्नही रखडले. अखेर श्रीलंकेतच कोर्ट मॅरेज आटोपले. दरम्यान, आईची ॲन्जिओप्लास्टी झाली तरी येऊ शकले नाही. आता कधी माहेरची भेट होते आणि वैवाहिक परंपरा पार पाडल्या जातात, अशी ओढ लागली आहे.
- स्वाती राळेकर - हेवगे (श्रीलंका)
------------
भेट झाली ती अखेरचीच
मी अधामधात नागपूरला येत होते. मात्र, टाळेबंदीमुळे सगळेच थांबले. दरम्यान, कोरोना संक्रमणाची दुसरी लाट आली. या लाटेत अन्य आजाराने आईची प्रकृती ढासळली. मात्र, टाळेबंदीमुळे येणे जमले नाही. जोवर पोहोचत नाही तोवर अखेरची भेट झाली. दुसऱ्याच दिवशी बाबाही गेले. अखेरच्या समयी भरपूर वेळ द्यावा ही इच्छा होती. मात्र, दैवयोगापुढे कुणाचे जमते का.
- भाग्यश्री तायडे-कावळे (बारामती)
..................