लाचेच्या सापळ््यातून निसटलेला आरोपी : पोलीस कोठडी रिमांड, आवारेसह चौघांची होणार चौकशीनागपूर : लाचेच्या सापळ्यातून निसटून तब्बल सहा महिने फरार राहून अटकपूर्व जामिनाची अयशस्वीपणे न्यायालयीन लढाई लढत असलेला कळमना पोलीस ठाण्याचा सहायक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) राजेशसिंग रामसमुजसिंग ठाकूर हा मंगळवारी न्यायालयाला शरण आला. त्याला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. लाखोच्या विदेशी तूर डाळ अफरातफरीचा तपास स्वत:कडे असल्याचे भासवून राजेशसिंग ठाकूर याने या प्रकरणातील संशयित आरोपींकडून लाच उकळण्याचा सपाटा सुरू केला होता. वासिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापूर येथील हॉटेल व्यवसायी खुर्शिद अहमद रकिमुल्ला खान ऊर्फ मुन्ना हा या लाच प्रकरणातील फिर्यादी आहे. त्याने डाळ अफरातफर प्रकरणी बद्रे आलम नावाच्या इसमाविरुद्ध कळमना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यावरून अपराध क्रमांक ३८७/२०१५ अंतर्गत भादंविच्या ४०७, ४११, ३४ आणि जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कलम ३, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मुन्नालाही आरोपी करण्यात आले होते. ठाकूर याने मुन्नासोबत संपर्क करून त्याचे नाव या गुन्ह्यातून वगळण्यासाठी २ लाखांची मागणी केली होती. मुन्नाने घाबरून डिसेंबर २०१५ मध्ये बद्रे आलाम याच्यामार्फत २ लाख रुपये ठाकूर याला दिले होते. त्यानंतर मुन्ना फरार झाला होता. मुन्नाने फेब्रुवारी २०१६ मध्ये सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर मुन्नाने उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. ४ मार्च २०१६ रोजी तपास अधिकाऱ्याला उच्च न्यायालयात उत्तर दाखल करावयाचे होते. आवारे यांचाही वाटा२७ फेब्रुवारी रोजी ठाकूरने मुन्नासोबत संपर्क करून त्याच्या बाजूने उत्तर दाखल करण्यासाठी ३ लाख रुपयांची मागणी केली होती. आपण आधीच २ लाख रुपये दिल्याने ३ लाख रुपये देण्याची आपली ऐपत नाही, असे मुन्ना हा ठाकूरला म्हणाला होता. १ मार्च २०१६ रोजी ठाकूर याने मुन्नाला बयाण नोंदवून घेण्यासाठी बोलावले होते. त्या दिवशी पुन्हा ठाकूरने त्याला ३ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. हे ३ लाख रुपये मला आवारे साहेब आणि आणखी चार जणांना द्यावे लागतील, त्यात माझाही वाटा आहे, असेही ठाकूरने त्याला म्हटले होते. मुन्नाला लाच द्यायची नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालय गाठून तक्रार नोंदवली होती. सौदेबाजीनंतर २ लाख रुपये घेण्याचे ठरले. यापूर्वीही २ लाख रुपये घेतल्याचे आणि म्हणून आपण तुला तीन महिन्याची सवलत दिल्याचे ठाकूरने म्हटले होते. या संभाषणाचे स्पष्टपणे डिजिटल रेकॉर्डिंग झाले होते. २ मार्च २०१६ रोजी सापळा रचण्यात आला होता. ठाकूरला सापळ्याची चाहूल लागताच त्याने लाच घेण्याचे टाळले होते. ९ मार्च रोजी ठाकूरविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. २ मार्चपासूनच तो फरार झाला होता. (प्रतिनिधी)फिर्यादीला दिली धमकीफरारीच्या काळात ठाकूरने मुन्नाला २१ आॅगस्ट रोजी धमकी देऊन तक्रार मागे घेण्यास म्हटले होते. मुन्नाच्या तक्रारीवर कारंजा पोलिसांनी ठाकूर याच्याविरुद्ध अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे. ठाकूर हा मंगळवारी न्यायालयाला शरण येताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रीतसर अटक केली. पोलीस निरीक्षक भावना धुमाळे यांनी आरोपीला विशेष न्यायालयात हजर केले. आरोपीच्या आवाजाचे नमुने घेणे आहे, गुन्ह्याच्या प्रथम खबरी अहवालात आवारे आणि अन्य चार, असा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात त्यांचा सहभाग आहे काय, याबाबत तपास करणे आहे, असे सरकार पक्षाने न्यायालयाला सांगून आरोपीच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली. बचाव पक्षाने पोलीस कोठडीस विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. न्यायालयात सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील ज्योती वजानी तर आरोपीच्यावतीने अॅड. जी. एम. गांधी यांनी काम पाहिले.
‘एएसआय’ न्यायालयाला शरण
By admin | Published: September 08, 2016 2:38 AM