नागपूर : उष्माघाताच्या रुग्णांच्या नोंदी ठेवणे आणि त्याची माहिती महापालिका, जिल्हा शल्यचिकित्सकापासून ते आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय संचालकांना पाठविणे, रुग्ण दगावल्यास शवविच्छेदन करणे, आदी प्रकार टाळण्यासाठी मनपासह काही शासकीय व खासगी रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णाला तापाचे रुग्ण म्हणून नोंद करून उपचार करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.
नागपूरचा दाहक उन्हाचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. पाच दिवसांपासून तापमान ४३ ते ४५ अंशाच्या दरम्यान स्थिरावले आहे. तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यास शरीरातील तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो. चक्कर, डोकेदुखी, मळमळ-उलटी, पोटात वेदना, गोंधळलेली अवस्था ही उष्माघाताची लक्षणे आहेत. दुर्लक्ष केल्यास जीवाला धोका होतो. त्यामुळे मेयो, मेडिकलसह मनपाच्या दवाखान्यात शितकक्ष तयार करण्यात आले. परंतु आतापर्यंत मेयोमध्ये केवळ दोन रुग्णांची नोंद झाली. -१०० पैकी १० ते १५ रुग्ण तापाचे
सुत्रानुसार, विशिष्ट चाचणी केल्यावर उष्माघाताचे निदान होते असेही नाही. उष्माघात व तापाच्या रुग्णावरील उपचार सारखाच असतो. सध्या मनपासह शासकीय रुग्णालयांमध्ये १०० रुग्णांमधून १० ते १५ रुग्ण तापाचे असतात. मात्र उष्माघाताच्या रुग्णांची नोंद ठेवण्यापासून त्याची माहिती आरोग्य विभागाला पाठविणे व इतरही सोपस्कार पार पाडावी लागतात. हे टाळण्यासाठी डॉक्टर उष्माघाताच्या रुग्णाची तापाचे रुग्ण म्हणून नोंद करतात.संशयित मृतांची संख्या १२मे महिना संपायला आला तरी संशयित मृत्यूचे ‘ऑडिट’ झाले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंगळवारी व बुधवारी शहरात सहा मृत्यूची नोंद झाली. तर मागील २५ दिवसांत १२ अनोळखी व्यक्ती बेशुद्धा अवस्थेत सापडले असता त्यांना मेयो व मेडिकलमध्ये दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषीत केले. हा उष्माघाताचा मृत्यू आहे का, हे तपासण्यासाठी ‘डेथ आॅडिट’ समिती आहे. परंतु अद्यापही या समितीची बैठक झाली नाही.